मुंबई : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या २५ नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मुंबईत शिवाजी पार्क येथे “संविधान सन्मान महासभेचेन आयोजन केले आहे. या महासभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने जनसागर उसळणार आहे. संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने या महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
२५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शेवटचे भाषण भारतीय लोकशाहीचे मार्गदर्शक तत्त्व मानले जाते. या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याच्या धोके, तसेच समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीची अपरिहार्यता स्पष्ट केली होती. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत उद्या मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने “संविधान सन्मान महसभा छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
या महासभेत सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि संविधान संरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा होणार असून, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातून आलेले विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. संविधानप्रेमी नागरिक, फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारवंत, मानवतावादी आणि लोकशाहीवादी जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनीही या महासभेचे महत्त्व अधोरेखित करत संविधान मूल्यांच्या जपणुकीसाठी सर्वांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगून मोठ्या संख्येने सर्वांनी या संविधान महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





