सोलापूर : सोलापूर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सर्व नद्या-नाल्यांना पूर आला आहे. मांडेगाव चांदणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे १५ ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी गावातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक शाळेचे काही शिक्षक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
पुरामुळे पूल पाण्याखाली गेल्याने, ध्वजारोहणासाठी नदीपलीकडून येणाऱ्या लोकांना चिखलातून आणि पाण्यामधून वाट काढत यावे लागले. काही लोकांनी बंधाऱ्याच्या बाजूने मार्ग काढत कार्यक्रमस्थळी कसेबसे पोहोचले. या घटनेमुळे गावकऱ्यांना दरवर्षी भेडसावणाऱ्या समस्येची पुन्हा एकदा आठवण झाली आहे.
या संदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पुराच्या वेळी वाहतूक खंडित होणार नाही. मात्र, या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या समस्येमुळे गावातील दैनंदिन व्यवहार आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी अडचण निर्माण होते. तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
भारतीय बौद्ध महासभा, बार्शी तालुका शाखेच्या मांडेगाव ग्रामशाखेतर्फे जयभीम बुद्धविहार, मांडेगाव येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पेन आणि संविधानाची प्रास्ताविका देऊन संविधानाप्रती जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मांडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तानाजी आरगडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी मुख्याध्यापक तानाजी आरगडे यांचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
सायंकाळी वर्षावासानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात ग्रामशाखेचे अध्यक्ष रामलिंग सोनवणे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर क्रांती आणि प्रतिक्रांती या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचे वाचन स्वाती सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गणेश चव्हाण यांनी मानले.
या कार्यक्रमाला वामन सोनवणे, मंगल सोनवणे, सोमनाथ सोनवणे, शोभा सोनवणे, भीमाबाई आवळे, यमुना रापुरंगळे, गौतम सोनवणे, नानासाठे सोनवणे, राजेंद्र सोनवणे, रमेश सोनवणे यांच्यासह मांडेगाव येथील बहुसंख्य ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.