यवतमाळ : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेत मदत व्हावी आणि त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून एक उपक्रम सुरू करण्यात आला होता. या परीक्षेची जबाबदारी Target Peack या संस्थेला देण्यात आली होती.
परंतु या उपक्रमाचे उद्दिष्ट आणि विश्वास दोन्ही धुळीस मिळवत, इयत्ता आठवीच्या प्रश्नपत्रिकेत “उच्च जातीचे नाव काय?” असा धक्कादायक प्रश्न विचारण्यात आला आहे.
प्रश्नासाठी दिलेले पर्यायी उत्तरे :
A) ब्राह्मण
B) क्षत्रीय
C) शूद्र
D) वैश्य
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर जातश्रेष्ठतेची भावना बिंबवणारा हा प्रश्न विचारल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात जातीयवादाची काळी छाया पडलीय का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यघटना समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित असून शैक्षणिक क्षेत्रातून जातव्यवस्थेचा नायनाट व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असताना, वर्णव्यवस्थेला थेट मान्यता देणारा असा प्रश्न विचारला जाणे अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे.
शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा असताना, प्रश्नपत्रिकेतून जात-श्रेष्ठतेचे घाणेरडे बीज पेरले जाणे ही केवळ चूक नाही, तर समाजाला परत जातव्यवस्थेकडे ढकलण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





