अकोला : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित बौद्धाचार्य, श्रामणेर प्रशिक्षण शिबिर, उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर आणि समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचा समारोपिय कार्यक्रम अकोला येथील आबासाहेब खेडकर सभागृहात उत्साहात संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पी.जे. वानखडे यांनी भूषवले, तर भन्ते राजज्योती, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी भिकाजी कांबळे आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यु.जी. बोराडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या वतीने देण्यात आलेल्या मानवंदनेने झाली. त्यानंतर धम्म पिठावर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून सामुदायिक वंदना घेण्यात आली. या वेळी शिवापुर, शिवर, शिवणी, हरिअर पेठ, आनंद नगर, खरप आणि महात्मा फुले नगर येथील उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचाही समारोप करण्यात आला.
राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई यांनी आपल्या भाषणात शिबिरार्थींना धम्माचे महत्त्व पटवून दिले आणि बौद्ध विचारांवर आधारित समाज निर्मितीसाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नवश्रामणेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला भिक्षू संघ, महाराष्ट्राच्या राज्य संघटिका सुनंदाताई तेलगोटे, प्रमुख केंद्रीय शिक्षक के. वाय. सुरवाडे, जिल्हा सरचिटणीस नंदकुमारजी डोंगरे, कोषाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह विविध विभाग प्रमुख, जिल्हा, तालुका आणि महानगरातील महिला व पुरुष कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्ह्यातील बौद्ध उपासक, उपासिका, बंधू, भगिनी तसेच लेझीम आणि आखाडा पथकातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्कृष्ट आखाड्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कोषाध्यक्ष विजय जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा महासचिव नंदकुमार डोंगरे यांनी केले. आभार प्रदर्शन संजय गवई यांनी केले. समारोपापूर्वी सुप्रसिद्ध आंबेडकरी चळवळीचे प्रबोधकार संजय कुमार राजदीप, राजेश सोनोने आणि त्यांच्या संचाने प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.