बुद्धप्रिय कबीर : चळवळीशी जाज्वल्य निष्ठा ठेवणारा सच्चा कार्यकर्ता

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

शेखर मगर

आंबेडकरी चळवळीवरील निष्ठा,  त्यासाठी काहीही करण्याचं झपाटलेपण, संघ-भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि रिपाइंच्या दलालांविषयी संजय उबाळेंच्या आचार-विचार अन् कृतीत भयंकर चीड होती. ‘संजू’ने मैत्री देखील समविचारी लोकांशीच केली अन् अखेरच्या श्वासापर्यंत निभावली सुद्धा. चळवळीत बेईमानी करणार्‍यांशी  ‘नो-कॉम्प्रमाईज’ म्हणजे ‘नो-कॉप्राईज’ असाच ‘संजू’चा स्थायीभाव होता. त्याने समाजासाठी स्वत:चे आयुष्य खर्चीले. नंतर समाजानेही त्याच्यावर खूप प्रेम केले. हे सर्वश्रृत आहे.  

1995 दरम्यान मी बारावी उत्तीर्ण झालो. त्यानंतर मिलिंद विज्ञान महाविद्यालयात बीएस्सी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांमुळे मला ‘अंनिस’चं आकर्षण होतंच. म्हणून ‘अंनिस’मध्ये सक्रिय झालो. पूर्वाश्रमीच्या संजय उबाळेंच्या (बुद्धप्रिय कबीर) विद्यार्थी चळवळीविषयी मी ऐकूण होतो. ‘संजू’ने मला त्याचवेळी विद्यार्थी चळवळीत आणलं होतं. 1995 ते 2020 अशी 25 वर्षांची आमची मैत्री होती. मोठ्या भावाप्रमाणे ‘संजू’ने माझ्यासाठी जीव आणि आनंद ओतला. ‘संजू’चं 25 वर्षांचं सार्वजनिक आणि खासगी जीवन मी  अतिशय जवळून पाहिलं-अनुभवलं आहे. ‘संजू’च्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख करायचा झालाच तर अनेक पैलुंवर प्रकाश टाकता येईल. आंबेडकरी चळवळीवरील जाज्वल्य निष्ठा, त्यासाठी काहीही करण्याचं झपाटलेपण, संघ-भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि रिपाइंच्या दलालांविषयी संजय उबाळेंच्या आचार-विचार अन् कृतीत भयंकर चीड होती. ‘संजू’ने मैत्री देखील समविचारी लोकांशीच केली अन् अखेरच्या श्वासापर्यंत निभावली सुद्धा. चळवळीत बेईमानी करणार्‍यांशी  ‘नो-कॉम्प्रमाईज’ म्हणजे ‘नो-कॉप्राईज’ असाच ‘संजू’चा स्वभाव होता. त्यानं समाजासाठी स्वत:चे आयुष्य खर्ची घातलं.  समाजानेही त्याच्यावर खूप प्रेम केलं.  पुरावे म्हणून नव्हे पण दाखले म्हणून लेखात ओघवती चर्चा करता येईल.

नागसेन वन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘संजू’ने पदवीचं शिक्षण घेतलं. औरंगाबादेतील प्रस्थ डॉ. आर. आर. भारसाखळे  प्राचार्य असलेल्या पीईएसच्याच शारीरीक शिक्षण महाविद्यालयात बीपीएड आणि एमपीएड केलं. या दरम्यान ‘संजू’चं भारसाखळे दादांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नातं निर्माण झालं. 1995 दरम्यान राज्यात सेना-भाजपचं सरकार आलं. मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उप-मुुख्यमंत्री झाले. 1996-97 दरम्यानची गोष्ट असेल. मुंडे यांनी भारसाखळे दादांशी असलेल्या ऋणानुबंधामुळे बाबासाहेबांच्या पीई संस्थेला साडे चार कोटींचेे विशेष आर्थिक पॅकेज जाहिर केले होतं. या ‘पॅकेज’मध्ये चार नवे वसतीगृहे आणि एक स्टेडियम उभारण्यात आलं. पण सेना-भाजप सरकारचे पीईएसला ‘एक फुटकी दमडी’ देखील नको. अशी ‘संजू’ने भूमिका होती.  ‘पॅकेज’ जाहिर झाल्यापासूनच त्यानं तीव्र विरोध करण्यास सुरूवात केली. प्रसंगी भारसाखळे दादांशी तीव्र मतभेद झाले. पण ‘संजू’ने कुणाचंही ऐकलं नाही. ‘गोपीनाथ मुंडेंचे पीईएसमध्ये पाय लागले तर आत्मदहन करू’ असा इशाराच त्यानं दिलेला मला आजही आठवतो. सरकारकडून पैसे घ्यावेत की घेऊ नये यावरून राज्यात खूपच ‘कॉन्ट्रवर्सी’ निर्माण झाली होती. राज्यभर अशी चर्चा निर्माण करण्यात ‘संजू’ यशस्वी तर झाला होता. त्यानंतर ‘चार हॉस्टेल्स आणि स्टेडियमच्या लोकार्पण प्रसंगी गोपीनाथ मुंडे यांचे नागसेन वन येथे हार्दिक स्वागत’ अशा नामफलकाला निषेध म्हणून त्याने ‘डांबर’फासले होते.

उद्घाटनापूर्वी सरकारने बळाचा वापर करून ‘संजू’ची उचलबांगडी केली. त्यानंतर मुंडेंचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरकारनं नाना क्लृप्त्या केल्या होत्या. सांगायचं तात्पर्य म्हणजे, ‘संजू’ने स्वत:च पितृतुल्य संबोधलेल्या भारसाखळे दादांशी आयुष्यभराचे नाते तोडून टाकलं, पण कॉम्प्रमाईज नाही केलं. हे तर मी स्वत: पाहिलं आहे. अर्थात यापूर्वीही तो सार्वजनिक जीवनात होताच, पण ‘संजू’साठी मुंडे विरोध हाच टर्निंग पाइंट ठरला. मग पुढंही  त्यानं  अशीच कृती करत वेगवेगळ्या चळवळी केल्यात. मुंडे विरोधी आंदोलनापूर्वी ‘संजू’ आंबेडकर कॉलेजचा ‘जीएस’ होता. संभाजी वाघमारे, किशोर साळवे, सुनील मगरे, वैशाली प्रधान, नंदा गायकवाड, देवेंद्र इंगळे, राजेंद्र गोणारकर, युुवराज धसवाडीकर यांच्या समवेत ‘संजू’ने विद्यापीठात विद्यार्थी चळवळीत काम केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर व संशोधन विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून खूप दीर्घकाळ त्यानं विद्यार्थी चळवळीत पाय रोवले होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात याच संघटनेने सक्रिय भूमिका घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नोव्हेंबर-1993 दरम्यान वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत या संघटनेतील शिष्टमंडळाला निमंत्रित केलं गेलं होतं. पवारांनी ‘संजू’सह शिष्टमंडळाला वाहन पाठवून मुंबईला बोलवलं होतंं. देशातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘बी प्लस’ची अट पाच टक्के गुणांनी शिथिल करण्याचा निर्णय यूजीसीनं घेतला होता. यूजीसीला आंदोलनाच्या माध्यमातून असे करण्यास बाध्य करणारा ‘संजू’च होता, हेही मला ठाऊक आहे.

1995-96 नंतरच्या प्रत्येक आंदोलनात माझाही ‘संजू’सोबत सक्रिय सहभाग होता. त्याचे विस्ताराने नोंद घेण्याची गरज नाहीये. ‘संजू’कडे दलित सेना स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद होते. मलाही 1995-96 दरम्यान त्यानेच शहराध्यक्ष केलं होतं. एरव्ही आंबेडकरी नेते ऐकमेकांचे खेकड्याप्रमाणे पाय ओढतात. पण त्याच्याकडे मनाची एवढी श्रीमंती होती की,‘ संजू’ने मला प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. प्रा. प्रतिभा अहिरे अन् राजानंद सुरडकर यांच्या मैत्रेय सांस्कृतिक मंचचे जिल्हाध्यक्षपद मला मिळाले. प्रा. राजेंद्र गोणारकर यांना जिल्हा सचिवपद दिलं गेलं. वैचारिक-सांस्कृतिक चळवळीतही संजू सोबत काम करण्याची संधी मिळाली. पण दहा वर्षांनी (2005) एकूणच चळवळीत खूप साचलेपण आलंं. मला नैराश्य येण्याच्या आधीच ‘संजू’ने पत्रकारितेत ढकलण्याचा बेत पक्का केला होता. विद्यापीठ वसतीगृहाच्या आंदोलनाची बातमी घेऊन ई-टीव्हीच्या कार्यालयात आम्ही दोघं गेलो. तर तिथे दुसर्‍या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी केली जात होती. माझा बीएस्सीचा वर्गमित्र जयेश मोरे ई-टीव्हीच्या एचआर विभागात होता. जयेशने मला परीक्षेला उपस्थित राहण्याचे सांगितले.  वास्तविक पाहता माझी अजिबात इच्छा नव्हती की मी नोकरी करावी. पण ‘संजू’ने मला परीक्षा देण्यास प्रवृत्त केले. उत्तीर्ण झालो, मुलाखत पार पडली तरीही मी रुजू होत नव्हतो. पण ‘संजू’ने माझे मन वळवले अन् म्हटले पत्रकारितेतूनही समाजाची सेवा करता येते. त्यानंतर मी भंडारा जिल्ह्यात ई-टीव्हीचा पत्रकार म्हणून रुजू झालो.  

‘संजू’ने पुढं स्वत:ला विद्यार्थी चळवळीतून बाजूला केलं. डावे-समाजवादी-लोकशाहीवादी-धर्मनिरपेक्ष नेते अन् कार्यकर्त्यांची मोट बांधून दलित अत्याचार विरोधी संंघर्ष समितीत स्वत:ला गुंतवूण घेतलं. मला दहा वर्षांच्या चळवळीची त्याने शिदोरी दिली होती. या बळावरच मी 29 सप्टेंबर 2006 रोजी घडलेलं भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी हत्याकांडाचा पाठपुरावा करू शकलो. खैरलांजीची पहिली बातमी मीच ई-टीव्हीवर प्रसारीत केली होती. भंडार्‍यात तो माझ्याकडे नेहमी येत होता. भैय्यालाल भोतमांगे आणि ‘संजू’ची भेट घडवून आणल्यावर ‘संजू’ खूप भावूक झाला होता. दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीचा संजू सचिव होता. भैय्यालालच्या भेटीची बातमी ई-टीव्हीवर झळकल्यामुळे तर ‘संजू’ खूपच खुष झाला होता. 2011 नंतर मी दैनिक भास्कर समूहातील ‘दिव्य मराठी’त रुजू झालो. पुन्हा औरंगाबादेत आल्यावर तो खूप खुष झाला होता. आता मी सतरा वर्षांपासून पत्रकारितेत काम करतोय. त्यात ‘संजू’च्या पाठबळाचा खूप मोठा वाटा आहे. ‘संजू’मुळंच मी पत्रकार झालो अन् निरंतर काम करतोय याचे श्रेय त्यालाच आहे.

कँसर झाल्याचं कळताच धिरोदत्तपणे केला सामना

‘संंजू’ला डिसेंबर-जानेवारी-2019 दरम्यान जेवणच जात नव्हतं. ‘ऍसिडिटी’ अशीच त्याची कायम तक्रार असायची. त्याला दवाखान्यात उपचार  घेण्याचाही तिटकारा असायचा. ‘ऍसिडिटी’मुळे जेवण जात नाहीये, असाच त्याचा व्होरा होता. सहा महिन्यांत त्याच्या वजनात लक्षणीय घट झाली. आम्ही त्याला शोधून उपचारासाठी आणण्याचा आग्रह करत होतो. पण ऐकतच नव्हता. लालनिशान पक्षाचे भीमराव बनसोड, स्वराज अभियानचे अण्णासाहेब खंदारे, साथी सुभाष लोमटे, वि. रा. राठोड, प्रा. पंडीत मुंडे, डॉ.  तेजस मुंडे, भारत शिरसाट, मधुकर खिल्लारे, मुकुल निकाळजे आणि मी स्वत: एमजीएममध्ये बळजबरीने त्याला दाखल केलं. खंदारे, मुंडे यांनी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांच्याशी चर्चा करून औषधोपचाराचा सर्व खर्च माफ केला होता. त्यानंतर सीटी स्कॅन, पेट स्कॅन, इंडोस्कॉपी, बायप्सी केल्यानंतर ‘संजू’ला अन्ननलिकेचा कँसर झाल्याचं निदान झालं. पण कँसर झाल्याचं कळाल्यामुळं ‘संजू’ अजिबातच हताश झाला नाही. अतिशय धिरोदत्तपणे त्याने या गंभीर आजाराचा मुकाबला केला.  शरद पवारांंप्रमाणे कँसरवर मात करणार अशी त्याची जिद्द होती. पण आयुष्यात सर्वच जिद्द पूर्ण करून घेणार्‍या संजूला ही जिद्द मात्र पूर्ण करता आली नाही.

डॉ. अरविंद गायकवाड यांनी केले मोफत उपचार

एमजीएम हॉस्पिटलने सांगितले की, अन्ननलिकेचे ऑपरेशन करावे लागेल. पण एमजीएममध्ये ऑपरेशन व्हावे अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे औरंगाबादेतील प्रादेशिक कर्करोग रूग्णालयाचे ओएसडी अन् बौद्ध धम्माचे अभ्यासक डॉ. अरविंद गायकवाड यांना मी ‘संजू’विषयी सांगितलं. तर त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन एमजीएममध्ये व्हिजीट केली. पुढे ‘संजू’ला  लगेच शासकीय कँसर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉ. गायकवाड सरांनी खूपच मदत केली. ‘संजू’कडे कुठलेही शासकीय कागदपत्रे नसताना त्यांनी उपचार सुरू केले. सुरूवातीला किमो दिले. नंतर 27 मार्च 2019 रोजी डॉ. अजय बोराळकर यांनी ऑपरेशन केले. सकाळी नऊ ते संध्याकाळी आठपर्यंत ऑपरेशन सुरू होतं. पुढंं आयीयूमध्ये उपचार घेतले. सुटी झाल्यानंतर संत कबीर शिक्षण संंस्थेचे सचिव धनंजय बोर्डे उर्फ मुन्ना यांनी ‘संजू’शी कुठलेही रक्ताचे नाते नसताना 8 हजार रूपये महिन्याचा फ्लॅट भाडे तत्वावर घेतला. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान नऊ महिने एखाद्या लहान बाळाची ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते. तेवढी काळजी मुन्ना आणि त्यांच्या टीमने घेतली. डिसेंबरमध्ये ‘संजू’ हमाल-मापाडी कामगार युनियनच्या कार्यालयात आश्रयाला आला. दोन महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारीत सिडको, एन-7 येथील व्ही.डी. देशपांडे सहभागृहातील एका खोलीत संजूने मुक्काम हलवला. येथे प्रकाश बनसोडे यांनी त्याची सुश्रुषा केली. सकाळ-संध्याकाळ जेवणाचा डबा दिला. ऑपरेशननंतर संजूने स्वत:च पूर्णपणे बरे झाल्याचे जाहिर करून टाकले होते. प्रत्यक्षात ‘ट्रीटमेंट’साठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये येण्यास तयारच होत नव्हता. त्यामुळे कँसर त्याच्या संपूर्ण शरीरात पसरला. गोळ्यांचा किमोही त्याने बंद केला होता. मग प्रकृती अधिकच खालावली. पुन्हा वर्षभरापूर्वी ज्या प्रमाणे त्याला बळाचा वापर करून रूग्णालयात दाखल केलंं होतं. अगदी त्याप्रमाणेच मी 20 मार्चला दुपारी बारा वाजता कँसर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सायंकाळपर्यंत तपासणीचे रिपोर्ट आले, त्यात कँसर शरीरात पूर्ण पसरल्याचे निदान झाले. त्यामुळे डॉक्टरांनी फक्त 24 तासच जगणार असे सांगितलं होतं. डिस्चार्ज घ्या असा सल्लाही दिला होता. डॉ. गायकवाड यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. मग 21 मार्चला माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, मुन्ना आणि आम्ही सर्वांनी त्याला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. जगण्याची अतिव इच्छा होती, पण 25 मार्चला त्याची प्राणज्योत मालवली. संचारबंदीतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे अंत्ययात्रेचीही परवानगी काढावी लागली. फक्त 20 जणांची परवानगी मिळाली. आयुष्यात प्रत्येकांशी सोशल डिस्टन्स कमी करून मैत्रीभाव जोपासणारा ‘संजू’च्या वाट्याला आलेलं मरण अतिशय वाईट होतं. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. ‘कोरोना’मुळे सामाजिक अंतर ठेवावे लागत आहे. म्हणून त्याची मे-जूनपर्यंत श्रद्धांजली सभाही घेऊ शकत नाही, हे किती वाईट आहे. पण ‘कोरोना’ साथीची लाट ओसरल्यानंतर मी ‘संजू’साठी ऑगस्टमध्ये का होईना श्रद्धांजली सभेचं आयोजन करीनच. संजूच्या आठवणींची स्मरणिका काढल्याशिवाय राहणार नाही, सरणात जळताना पाहिले. पण माझा मित्र कायम स्मरणात ठेवला जाईल. असे काही तरी करून दाखवीनच. संजूच्या सर्व चाहत्यांची मी मोट बांधल्याशिवाय राहणार नाही. एवढंच यानिमित्ताने सांगू इच्छितो.  

संपर्क : 9423188500


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *