कोल्हापूर : सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.२५) कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनच्या मुख्य सभागृहात होत आहे. आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार हे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ या पुस्तकात राजकीय सत्तेपासून वंचित असलेल्या समूहाच्या राष्ट्रीय राजकीय संघर्षाचा वेध घेण्यात आला आहे. पुणे येथील सुगावा प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे सैनिक आणि माजी सीमा शुल्क अधिकारी मदन पवार असतील. तसेच, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, प्रा. डॉ. अमर कांबळे, ‘बार्टी’चे संशोधन अधिकारी प्रा. डॉ. संभाजी बिरांजे, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. क्रांती सावंत आणि जिल्हाध्यक्ष जे. के. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.