मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुंबई दौऱ्यात शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. “मराठी अस्मितेचे राजकारण करणारे स्वतःच्या शाळेचे नाव बदलू शकले नाहीत, ते मराठी काय वाचवणार?” असा सवाल करत त्यांनी ठाकरेंच्या राजकारणावर सडकून टीका केली.
ठाकरेंच्या ‘मराठी अस्मिते’वर प्रश्नचिन्ह
सुजात आंबेडकर म्हणाले की, “मराठी अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्या ठाकरेंची दोन्ही मुले ‘इंग्लिश मीडियम’मध्ये शिकली. ज्या शाळेत ते शिकले त्या शाळेचे नाव ‘बॉम्बे स्कॉटिश’ आहे. स्वतःच्या शाळेचे नाव ज्यांना बदलता आले नाही, ते अस्मिता काय जपणार?
पुढे ते म्हणाले, वरळीत मते हवी होती तेव्हा ‘केम छो वरळी’चे बॅनर लावले आणि तमिळ मतांसाठी लुंगी घालून फिरले. आता पक्ष संपत आलाय म्हणून यांना पुन्हा मराठी अस्मितेचे नाटक सुचले आहे.”
शिवाजी पार्क आणि ६ डिसेंबरचा ‘जातीवाद’ उघड
राज ठाकरे आणि शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांवर निशाणा साधताना सुजात आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला. “६ डिसेंबरला चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारे भीमसैनिक काय मराठी नाहीत? मग जेव्हा भीमसैनिक तिथे येतात, तेव्हा राज ठाकरे आणि त्यांचे नातेवाईक घरे बंद करून फिरायला का जातात? कारण त्यांना तिथे येणारा दलित-बहुजन नको असतो. हाच तो ‘मनुवादी’ मराठी चेहरा आहे जो एरवी अस्मितेच्या गप्पा मारतो पण प्रत्यक्षात जातीवाद जपतो.”
भाषावाद आपला मुद्दा नाही, आपला लढा जातीवादाविरुद्ध!
सुजात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील विविध घटनांचा दाखला देत ‘मराठी विरुद्ध मराठी’ असा होणारा अन्याय मांडला.
खैरलांजी, भीमा कोरेगाव, अक्षय भालेराव, नितीन आगे आणि सक्षम ताटे – या सर्व प्रकरणांत बळी गेलेले लोक मराठीच होते आणि त्यांच्यावर अन्याय करणारेही मराठीच होते. त्यामुळे “हा मुद्दा भाषेचा नाही, तर महाराष्ट्रातील जातीवाद संपवण्याचा आहे,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
विद्यापीठाच्या नामांतरावरून उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंच्या वडिलांच्या (बाळासाहेब ठाकरे) जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत सुजात यांनी हल्ला चढवला. “ज्यांनी ‘घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ’ असे म्हणून मराठी माणसाचाच अपमान केला, ते आज अस्मितेच्या नावाखाली मते मागत आहेत. जर शिवसेनेचा कोणी माणूस मते मागायला आला तर त्यांना सांगा – आमच्या घरात पीठ पण आहे आणि औरंगाबादमध्ये आमच्या बापाच्या (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) नावाचे विद्यापीठ पण आहे!”
‘वंचित-काँग्रेस’ युतीला मतदान करण्याचे आवाहन
मराठी अस्मितेचा हा जुमला तुम्हाला शिक्षण, आरोग्य किंवा रस्ते देणार नाही, उलट यामुळे दोन समाजात भांडणे लागतील आणि पिढ्या बरबाद होतील, असा इशारा सुजात आंबेडकरांनी दिला. मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुंबईकरांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीला सक्षम पर्याय म्हणून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांचा प्रचार दौरा पार पडला. यावेळी झालेल्या जाहीर सभेला मोठी गर्दी झाली होती.





