अहिल्यानगर : शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील घरासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज (दि. २१) चटणी-भाकर खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्याने तसेच ओला दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांच्या पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत चटणी-भाकर खाऊन आपला निषेध नोंदवला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीनंतर विविध पक्षांचे नेते, पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, दिवाळी होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
तसेच, शासनाने अद्याप ओला दुष्काळही जाहीर केला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजळे यांच्या निवासस्थानासमोर चटणी-भाकर खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी करत शासनाचा निषेध केला.