हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया नोंदवत काँग्रेसच्या धोरणात्मक चुकांवर थेट प्रहार केला आहे. ते म्हणाले की, “या संपूर्ण निवडणुकीत भाजप, ईव्हीएम आणि निवडणूक आयोग या महागठबंधनाने विजय मिळवला आहे,”
बिहारमध्ये काँग्रेसची स्वतःची ताकद मर्यादित असताना आणि प्रभावी नेतृत्व नसतानाही त्यांनी आरजेडीसोबत वाद घालत अनावश्यकरीत्या अधिक जागा घेतल्या. त्या जागांवर काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात पराभव झाल्याने त्याचा आरजेडी-काँग्रेस आघाडीला थेट फटका बसला.
युतीच्या राजकारणात काँग्रेसने ‘बिग ब्रदर’ (मोठा भाऊ) चा भाव सोडण्याची गरज असल्याचे सुजात आंबेडकरांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही तुम्हाला ‘ब्रदर’ म्हणून मानतो, युती करण्यासही तयार आहोत; पण तुम्ही आता ‘बिग’ राहिलेले नाही. हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे.”
वंचित बहुजन आघाडीच्या धोरणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप आणि मित्रपक्ष सोडून आम्ही स्थानिक पातळीवर युती करू. जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान राखला जाईल आणि कार्यकर्त्यांना योग्य, सन्मानपूर्वक जागा मिळतील, तिथे पक्ष युतीस तयार असेल.
काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने महाराष्ट्रात शहाणपण दाखवत वंचित बहुजन आघाडीसोबत स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेतला आहे. हा शहाणपणा काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत दाखवला असता, तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता,” अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
बिहारच्या निकालानंतर विरोधी आघाड्यांतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसची रणनीती, जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचा अभाव या मुद्द्यांची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.





