भीमराव तायडे गुरुजींचे मार्गदर्शन – “अकोला पॅटर्न”नुसार वंचित बहुजन आघाडीचे काम परभणीत बळकट करण्याचे आवाहन
परभणी : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी (उत्तर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक आज वंचित बहुजन आघाडीच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तायडे गुरुजी उपस्थित होते.
या बैठकीत भीमराव तायडे गुरुजींनी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “दि. १० जानेवारी २०२५ रोजी मुंबईच्या दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या राज्य मेळाव्यात संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी स्पष्टपणे जाहीर केले होते की भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करतील.”तायडे गुरुजींनी ‘अकोला पॅटर्न’चा उल्लेख करत सांगितले की, ज्या प्रकारे अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्य मजबूतपणे उभे आहे, त्याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातही संघटितपणे कार्य उभारले पाहिजे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले आणि अशा प्रकारच्या बैठका प्रत्येक शहर, तालुका आणि जिल्ह्यात सातत्याने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली.
बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी हॉल तुडुंब भरून टाकला होता. विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हॉलच्या बाहेरही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बैठकीला पूज्य भदंत पी. धम्मानंद, राज्य सचिव बाबासाहेब धबाले, जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) तुकाराम ढगे, मराठवाडा प्रमुख समता सैनिक दलाचे आनंदा भेरजे, माजी जिल्हाध्यक्ष व्ही. व्ही. वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष विश्वनाथ जोडपे, उपाध्यक्ष के. वाय. दवंडे, सरचिटणीस गौतम दीपके (परभणी दक्षिण), प्रेमलता साळवे, एम. एम. बरे, शिवाजीराव आवळे, सुनील पवार, सूर्यकांत साळवे, नागसेन हत्तीआंबिरे, नरेंद्र सोनुले, देवराव बहादुरे, शामराव जोगदंड, रमेश जोंधळे, शिवराज कांबळे, विजयकुमार सावंत, लक्ष्मण गायकवाड, राजेश गायकवाड, राहुल उजागरे, अरविंद पांडववीर, शुद्धोधन भाग्यवंत यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. आय. खेडकर यांनी केले, प्रस्तावना प्रा. अतुल वैराट यांनी सादर केली, तर आभार प्रदर्शन विश्वनाथ यांनी मानले.
या बैठकीत भारतीय बौद्ध महासभेचे आजी-माजी पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






