अकोला : पातूर तालुक्यातील भंडारज बु. (ता. पातूर) येथील जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावातील महिला व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) घागर मोर्चा काढून तक्रार दाखल केली आहे. योजना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून लाखो रुपये खर्च झाले असतानाही, गावकऱ्यांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आणि गावात तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
२०२२ मध्ये भंडारज बु. येथे जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. कंत्राटदार श्याम माहोरे यांनी या योजनेचे ९८ टक्के काम पूर्ण केल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने दिला असून, त्यासाठी ४८.७३ लाख रुपये खर्च झाल्याचं नमूद आहे. मूळ योजनेचा उद्देश प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा होता.
मात्र, जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता मिलिंद जाधव, त्यांच्या नेमणुकीचे खासगी पर्यवेक्षक, तसेच ‘वायकॉम’ कंपनी आणि कंत्राटदार श्याम माहोरे यांनी संगनमत करून या कामात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच पूर्ण झाली असून, गावकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मुख्य पाईपलाईन अस्तित्वात नसतानाही जोडणीचा बनावट अहवाल
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, देऊळगाव आस्टूल येथून येणाऱ्या मुख्य पाईपलाईनला शिर्ला फाट्याजवळ जोडणी करून पाणीपुरवठा सुरू केल्याचा खोटा अहवाल तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, ही मुख्य पाईपलाईन अकोला-हैदराबाद महामार्गाच्या कामादरम्यान तोडून काढण्यात आली होती. यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतः पातूर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तरीही, अस्तित्वात नसलेल्या पाईपलाईनची जोडणी दाखवून बनावट नोंदी तयार करण्यात आल्या आहेत.
योजनेचा लाखो रुपये खर्च झाला असला तरी, गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जल जीवन मिशनचा उद्देश प्रत्येक कुटुंबाला दररोज ५५ लिटर सुरक्षित पाणी देणे हा होता. मात्र, भ्रष्टाचारामुळे हा उद्देश सफल झाला नाही, ज्यामुळे महिलांचा श्रम आणि वेळ वाया जात आहे.
यावेळी युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, तालुका अध्यक्ष सम्राट तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, मंगला इंगळे,रूपाली इंगळे, मयुरी वानखडे,आशा सुरवाडे, जयश्री करवते, स्मिता हातोले, परमिला सुरवाडे, ललिता सरबोल,अरुणा सुरवाडे, सोनू खंडारे, राजकन्या सुरवाडे, दिपाली बोरकर,मंगला बोरकर, सविता सुरवाडे, अंकुश शेंडे, अजय इंगळे, संदेश करवते, प्रदीप सुरवाडे, श्रीकांत सुरवाडे, राहुल सुरवाडे,
निर्भ इंगळे,आकाश खंडारे, नंदकिशोर सुरवाडे, आशिष इंगळे, संघपाल इंगळे, नंदू सुरवाडे, निलेश इंगळे,जयसन वानखडे, बंडू इंगळे, सोनू मोहोळ, प्रकाश इंगळे,बाबुराव इंगळे,प्रशांत गवई,पिंटू इंगळे, शैलेश बोरकर, रत्नदीप सुरवाडे, प्रतीक इंगळे, सोनू खंडेराव, आदित्य खंडारे, सुधाकर तेलगोटे,बबन इंगळे, उज्वला इंगळे,विजया सुरवाडे, मायावती सुरवाडे ग्रामस्थ उपस्थित होते. यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ तक्रार देण्यासाठी उपस्थित होते. ग्रामस्थांनी या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आणि दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails