अकोला : पातूर तालुक्यातील भंडारज बु. गावातील दलित वस्तीत अनेक वर्षांपासून सुरू असलेली लो व्होल्टेजची समस्या अखेर वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढाकाराने निकाली निघाली. या भागात केवळ दोन २५ केव्हीचे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे नागरिकांना कमी दाबाचा विजपुरवठा व सततचा वीज लपंडाव सहन करावा लागत होता.
कूलर, पंखे यांसारखी उपकरणे चालत नसल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला होता. वारंवार तक्रारी करूनही तोडगा निघत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे व तालुका युवा अध्यक्ष सम्राट तायडे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला.
अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर, उपविभागीय अभियंता रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन बरडे यांनी तातडीने सर्व्हे केला. त्यानंतर एक २५ केव्हीचा कट-आऊट बॉक्स बसविणे तसेच आर्थिंगची व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.
या कार्यात माजी सरपंच राजेंद्र इंगळे, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सदस्य किशोर सुरवाडे, सागर इंगळे, अंकुश शेंडे, गोलू इंगळे, संदेश करवते यांचाही सक्रिय सहभाग होता. या पुढाकारामुळे भंडारज बु. दलित वस्तीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विजेच्या समस्येवर कायमचा तोडगा निघाला असून नागरिकांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे.