बीड : नगरपालिका निवडणुकीच्या आदल्या रात्री बीड शहरात मोठा गोंधळ उडाला आहे.
बीड येथे स्कुटीवरून पैसे वाटप केले जात आहे. असे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच स्कुटीच्या डिक्कीत राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह असलेली पोस्टर्सही दिसत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. हा सर्व प्रकार पेठ बीड भागातील सोनार गल्लीमध्ये रात्री घडली आहे. दोन तरुणांना काही युवकांनी थांबवले. पैसे वाटपाच्या आरोपांमुळे बीडमध्ये निवडणुकीची हवा अधिकच गरम झाली आहे.
या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ समोर आले असून त्यात पाचशे रुपयांच्या नोटा स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर उपस्थितांनी दोन्ही तरुणांना पकडून पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र याबाबत पेठ बीड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी खेडकर यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. “आम्हाला कोणतीही रोकड आढळून आलेली नाही. केवळ काही लोकांकडून चाकू ताब्यात घेतले आहेत,” अशी प्राथमिक माहिती त्यांनी फोनवरून दिली. पण व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या नोटा आणि डिक्कीत चाकू असल्याचा आरोप यामुळे परिस्थिती गोंधळलेली आहे.






