पुणे : भोजन-ठेका टेंडर रद्द करण्याचे आदेश मात्र तरीही कमीशनखोरी साठी टेंडर कायम ठेवल्याची बनवाबनवी बार्टी महासंचालक यांनी चालवली असून वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे वतीने भुख्या आणि भ्रष्ट लोकांना जेवणाचे रिकामे डब्बे देवून निषेध करीत घेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव तथा प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे येथील विजयस्तंभ येथे साजरा करण्यात येत असलेल्या ‘शौर्य दिवस’ निमित्त भोजन पुरवठा साठी बार्टीचा निधी खर्च केला जात आहे. मुळात जिल्हा नियोजन मधून ह्याची तरतूद करता आली असती परंतु संशोधन व प्रशिक्षण साठी असलेला निधी वापरला जात आहे, ही उधळपट्टी योग्य नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे परदेशी शिक्षणासाठी गुण वाढ करून संख्या मर्यादित करण्यात आली आहे, पीएचडी संख्या कमी करणे, प्रशिक्षण संस्था निवडी मध्ये घोळ सुरू आहेत.ही संस्था बंद करण्याचा भाजप प्रणित सरकारचा डाव आहे असा आरोप करीत वंचित युवा आघाडीने निवेदन दिले होते.त्यावर महासंचालक सुनील वारे ह्यांनी सदर भोजन आदेश ठेका रद्द केल्याचे पत्र पाठविले होते.परंतु दुसऱ्या दिवशी बार्टीचे वेबसाईट वर खुलासा करणारी कात्रणे टाकत आंबेडकरी समूहाची दिशाभूल करण्यात आली.ह्या मुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर रोजी भोजन वाटपाचे काम बार्टीने केले आहे. मात्र गेल्या वर्षी या भोजन कार्यक्रमांमधून योग्य प्रमाणात भोजन वाटप करण्यात आले नव्हते. असा प्रत्यक्षदर्शिंनी विविध समाजमाध्यमांवरुन स्पष्ट केले आहे. या भोजन ठेक्यांमध्ये अंदाजित किंमतीपेक्षा दुप्पट देयके बार्टीकडून अदा करण्यात आली आहेत. या भोजन ठेक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होताना दिसत आहे. बार्टीचे महासंचालक यांचे भोजन ठेका कंत्राटदार यांच्याशी संगनमत असल्याची संस्थेमध्ये सध्या चर्चा असून वर पर्यंत कमीशन पोहचवावे लागत असल्याचे कंत्राटदार बोलतात. ह्या बाबीची सक्षम शासकीय यंत्रणेकडून विभागीय चौकशी करुन त्यांची बार्टीच्या दोषींची पदावरुन तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी.अशी मागणी होत असताना तोच कित्ता शौर्य दिन कार्यक्रमात सुरू करण्यात आला त्याचा सर्व पातळीवर निषेध केला जात आहे.
एकीकडे, BARTI – 2021 च्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थ्यांनी अधिछात्रवृत्तीकरिता ५१ दिवस तर मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करावे लागले.आजही ९५ दिवसापासून संशोधक विद्यार्थि उपोषण करीत आहेत त्याचे कुणालाही सोयर सूतक नाही.शेकडो विद्यार्थी अद्याप अधिछात्रवृत्ती पासून वंचित राहिले आहेत.या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याकरिता निधी उपलब्ध नसल्याचे महासंचालक व शासन सांगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनर्थ मंत्री अजित पवार सभागृहात पीएचडी करून काय दिवे लावणार? असा उपहास करतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे याच आंदोलनाच्या दरम्यान तब्येत बिघडल्यामुळे आंबेडकर विचारांचा उच्चविद्याविभूषित विद्यार्थी अमोल खरात यांचे निधन झाले आहे. परदेशी शिष्यवृत्तीपासून अनेक पात्र विद्यार्थ्यांना क्रिमीलेअर लावून अपात्र केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बार्टीचा निधी हा बार्टीच्या उद्देशास अनुसरुन खर्च केला जावा असे अपेक्षित असताना निधी भोजनावळींवर उधळपट्टी करण्यात येत आहे. म्हणून संदर्भित निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी मागणी करण्यात येत आहे. भ्रष्ट अधिकारी यांची हकालपट्टी व भोजन निविदा रद्द न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने बार्टी मध्ये २९ तारखेला ह्या भुख्या आणि भ्रष्ट लोकांना जेवणाचे रिकामे डब्बे देवून निषेध करीत घेराव घालण्याचा इशारा पातोडे यांनी दिला आहे.
बार्टीने हेका कायम ठेवल्यास कोरेगांव भिमा येथे बार्टीचे स्टॉल वर देखील आंदोलन करण्याचा इशारा देखील युवा आघाडीने दिला आहे