Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

mosami kewat by mosami kewat
October 3, 2025
in बातमी
0
बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

       

(सतत नकारात्मक चष्मे घेतलेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या कानाखाली आवाज काढणारी गेल ऑम्वेट यांची लेखणी. बौद्ध धम्मालाही धर्माच्या चौकटीत बसवून आरोप करणाऱ्या ब्राह्मण आणि देशी सरंजामी यांनी नक्कीच वाचले पाहीजे).

माझ्या जीवनाचा हा प्रवास आणि माझी वैचारिक-संशोधनात्मक वाटचाल मला बुद्धाकडे घेऊन गेली. अभ्यासाअंती माझ्या लक्षात आले की, भारतात बुद्ध धम्माच्या प्रभावाची जवळपास एक हजार वर्षे इतिहासातून गायब करण्यात आलेली आहेत. याच काळात जातीय-धार्मिक शोषण रोखण्याचा जबरदस्त प्रयत्न झाला होता. परंतु हे माहितच नसल्यामुळे पुरोगामी चळवळीतले सर्वजण आपला देश हजारो वर्षे जातीय-धार्मिक शोषणाच्या जोखडात असल्याचेच भाषणांमध्ये सांगत राहिले. सुमारे एक हजार वर्षे बुद्ध धम्माने, बौद्ध जनतेने आपला खोल प्रभाव ठेवला होता आणि शोषणाला स्थिर व्यवस्था होऊ दिले नाही हा इतिहास लपून राहिला होता.

आजचे सर्व शोषित आणि ब्राह्मणेतर जातींमधले सर्व लोक एक हजार वर्षे बौद्धच होते. बौद्धांच्या, भिक्खूसंघाच्या रक्तलांछित कत्तली झाल्यानंतर पुन्हा ब्राह्मण्यवादी धर्माची गुलामी सर्वांच्या उरावर बसली. हा इतिहास समोर आला तर आज जी जनता स्वत:ला हिंदू समजून व्यवहार करते तिलाही ती बौद्धच होती याची जाणीव होईल. ‘घरवापसी’चा अर्थ बौद्ध होणे असाच होऊ शकतो हेही तिला कळेल. त्यासाठी मी खूप परिश्रम घेऊन ‘भारतातील बौद्ध धम्म – ब्राह्मणी धर्म आणि जातीयतेला आव्हान’ हे पुस्तक लिहिले. बौद्ध होणे म्हणजे एक धर्म स्वीकारणे आणि धर्म हा नेहमीच रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यामध्ये लोकांना अडकवून ठेवतो, शोषणाच्या प्रक्रियेत नेतो, असे माझ्या आणि भारतच्या काही मित्रांचे, सहकार्‍यांचे म्हणणे होते आणि आजही आहे. पण आम्हा दोघांनाही ते पटत नाही. बुद्ध धम्म हा मुक्तीवादी आहे.

‘स्वत:च स्वत:चा दीप हो’ हे शिकवणारा आहे. तर्काला, अनुभवाला पटेल तेवढेच स्वीकारा असे तो म्हणतो. जग क्षणाक्षणाला बदलत असते, त्यासाठी कार्यकारणभाव आहे असे तो मांडतो. त्यामुळे तो इतर सर्व धर्मांपेक्षा वेगळा असा मुक्तीदायी धर्म आहे, असे आमचे ठाम म्हणणे आहे. जातीव्यवस्थेचा अंत करण्याच्या प्रक्रियेत बौद्ध धम्म स्वीकारण्याचे बाबासाहेबांनी उचललेले पाऊल हे अत्यावश्यकच होते असे आमचे मत आहे. बौद्ध जनतेमध्ये आज जरी काही चुकीच्या गोष्टी होत असल्या तरीही हीच जनता आज सर्वात जास्त जागृत आहे. सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. जातीअंताच्या लढाईत आग्रही आणि अग्रेसर आहे. याचे कारण ती बौद्ध आहे हेच आहे.

आजपर्यंत स्थापन झालेल्या सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा आणि ‘हिंदू’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या धर्माच्या धर्ममार्तंडांनी पवित्र मानलेल्या पुराणे, महाकाव्ये, मनुस्मृती इत्यादी वाड्.मयाचा विचार केला तर स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेले आहे, हे स्पष्ट दिसते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा जरी वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये आणि धार्मिक वाड्.मयामध्ये कमी-जास्त असल्या तरीसुद्धा एकंदरीनेच त्यांना कनिष्ठ दर्जा दिला गेला आहे.

त्यांच्या स्त्री म्हणून होणार्‍या शोषणाला मान्यता दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर बुद्ध धम्म हा एकच असा धम्म/धर्म आहे जो,

1) तुम्हाला स्वत:च (ज्ञानाचा) दीप व्हा असे सांगतो.

2) दु:खमुक्ती हा या धम्माचा मुख्य उद्देश आहे.

3) दु:ख आहे, दु:खाच्या अस्तित्त्वाला कारणे असतात आणि ही कारणे नाहीशी करून दु:खमुक्तीकडे जाणे शक्य आहे असे सांगतो.

4) ज्या धम्माने जातीव्यवस्था पूर्णपणे नाकारली आहे. एवढेच नव्हे तर ती मानवनिर्मित असून मानवी समाजासाठी अनैसर्गिक आणि शोषण करणारी आहे असे सांगितले. त्यामुळे जातीव्यवस्थेचा अंत करण्यासाठीचा सिद्धान्त विकसित करण्याचा पाया बुद्ध धम्माच्या मांडणीत सापडतो. जातीव्यवस्था हा वर्गीय शोषण आणि स्त्रियांचे शोषण संपवण्याच्या आड येणारा मुख्य अडथळा आहे. बुद्ध धम्माने त्यावर प्रहार केला.

5) धम्माचे मुख्य प्रवर्तक तथागत गौतम बुद्धच असे सांगतात की, ‘अभ्यासाच्या, चिकित्सेच्या आणि अनुभवाच्या आधारावर जर माझे म्हणणे तुम्हाला पटले तरच त्याचा स्वीकार करा. माझे जे कालबाह्य वाटेल ते सोडून द्या. जे कालातीत वाटेल ते स्वीकारा.’ त्यामुळे धम्म समग्र मुक्तीगामी आहे. स्त्रियांच्या मुक्तीसाठी वैचारिक, नैतिक, भावनिक अशा सर्व बाजूंनी आणि तत्त्वज्ञानाच्या अंगाने स्त्रियांंना कृतिप्रवण करणारा हा धम्म आहे. यासंदर्भात चर्चा करावी अशी एक महत्त्वाची घटना बुद्ध हयात असताना भिक्खू संघाबाबत घडली होती. सुरुवातीच्या काळात स्त्रियांना भिक्खू संघात प्रवेश नव्हता, ही या घटनेची पार्श्वभूमी होती.

खुद्द तथागत बुद्धाच्या घरच्या स्त्रिया शाक्य गणसंघातील इतर स्त्रियांसह त्यांचे गार्‍हाणे घेऊन भिक्खू संघाकडे गेल्या. त्यांनी भिक्खू संघात प्रवेश मिळण्याची मागणी केली. पण सरळ, थेट पद्धतीने त्यांना भिक्खू संघात प्रवेश मिळाला नाही. स्त्रियाही माघार घ्यायला तयार नव्हत्या. तथागतांनी भिक्खू आनंदला चर्चेसाठी पाठवले. या चर्चा आणि विचारविनिमयानंतर स्त्रियांना संघात प्रवेश दिला पाहिजे असा निर्णय झाला. संघ तिथून पुढे भिक्खू आणि भिक्खूणी अशा दोघांचा झाला. त्यामुळेच ‘थेरीगाथा’ जन्माला येऊ शकली.

बुद्धांनी अष्ट-अंगिक मार्गाने दु:ख विरोधाकडे जाता येईल अशी मांडणी केली. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक जीविका, सम्यक प्रयास, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी असा अष्ट-अंगिक (अष्टांगिक) मार्ग सांगितला. स्त्रियांनी स्वत: स्वत:चे दीप होऊन या मार्गाने जाण्यासाठी भिक्खू संघात प्रवेशाची मागणी केली. कारण त्यांना इतर प्रकारच्या मानवी दु:खांबरोबरच स्त्री म्हणून असलेल्या विशेष दु:खातूनही मुक्ती पाहिजे होती. स्त्री-प्रधान मुक्त गणसमाजाचे विसर्जन होऊन पुरुष-प्रधान दासप्रथाक गणसमाजामध्ये समाजाचे परिवर्तन झाल्यावर मनुष्य म्हणून असलेल्या दु:खाबरोबरच स्त्री म्हणून असलेल्या विशिष्ट दु:खाची निर्मिती झाली होती.

म्हणूनच स्त्रियांची संघप्रवेशाची मागणी ही मुक्तीगामी होती. भिक्खू संघाचा सर्वात सन्माननीय भिक्खू उपाली हा संघात येण्यापूर्वी न्हावी काम करणार्‍या सर्वसामान्य कुटुंबातला होता. भिक्खू सुनीत हा पुक्कस नावाच्या हीन समजल्या जाणार्‍या समाजातला होता. उपालीचा विनयपिटकावरील अधिकार बुद्धाखालोखाल मानला जात होता, तर सुनीतची गाथा थेरगाथेत समाविष्ट केली गेली होती. साति हा मच्छिमार समाजातला होता. तोही भिक्खू संघाचा विशेष तत्त्वज्ञ होता. गाथा ही अशाच सर्वसामान्य कुटुंबातून आलेली होती. पुण्णा व पुण्णिका या दासी होत्या. सुभा ही लोहार काम करणार्‍या कुटुंबातली होती. या सर्वांना भिक्खू संघामध्ये सन्मानाने स्वत:चा विकास करता आला.

जातीव्यवस्थेला विरोध करणारे इतरही श्रमप्रवाह त्या काळी होते. पण तथागत गौतम बुद्धांनी जातींची उतरंडीची व्यवस्था असमर्थनीय असल्याचे शास्त्रीय पद्धतीने दाखवून दिले. जाती-विभडगम् पाणानं, अज्यामज्या हि जातियो एवं नत्थि मनुस्सेसु, लिंगम् जातिमयं पुथु (अर्थ – मनुष्येतर प्राणिमात्रांमधे भिन्नभाव दाखवणार्‍या जाती असतात, पण मनुष्यांमध्ये पृथकता दाखवणारे जातिमय लिंग (खूण) नसते.) स्त्रीप्रधान गणसंघात विमुक्त असलेल्या आणि उत्पादक कृषी व्यवस्थेच्या उत्पादन-वितरणाचे व्यवस्थापन गणलोकशाहीच्या पायावर करणार्‍या स्त्रिया शोषणाच्या निर्मितीपूर्वीच्या समतेच्या व्यवस्थेचे प्रतिनिधित्त्व करीत होत्या. संघटित हिंसाचाराची साधने निर्माण करून स्थिर शेतीचे संरक्षण करण्याच्या कार्यातून पुरुषप्रधानता निर्माण झाली आणि पुरुषप्रधान संघगणांची आणि गणलोकशाहीच्या कक्षेबाहेरील दासांचे शोषण करून उत्पादन घेण्याचीही पद्धत सुरू झाली.

स्त्रीप्रधानतेत सर्वांचेच स्वातंत्र्य, एकमेकांवरील प्रेम आणि समता यांचे पोषण होत होते. पण पुरुषप्रधान संघगणांमध्ये जरी गणांच्या अंतर्गत लोकशाही असली तरी तिच्यात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. आणि गणाच्या बाहेरील लोकांना दास म्हणून वापरून उत्पादन केले जात होते. संघगणातल्या स्त्रिया दुय्यम ठरविलेल्या आणि गणबाह्य स्त्रिया दासी म्हणून शोषित अशी नवी स्थिती होती. तथागत बुद्धांचा जन्म अशा प्रकारातील असलेल्या शाक्य गण संघात झाला. त्यांना दोन गणांच्या रक्तरंजित संघर्षाचा कटु अनुभवही आला. शेतीसाठी कळीची भूमिका बजावणार्‍या पाण्याच्या उपयोगावरून हा संघर्ष झाला. या सर्व परिस्थितीत तथागतांना ‘सब्ब दु:ख’ असलेली परिस्थिती अनुभवाला आली.

संघगणांचा पराभव करून निर्माण झालेल्या नव्या राजेशाही शासनसत्तेचा आणि सर्व प्रकारात अस्तित्त्वात असू शकणार्‍या लोकशाही-स्वातंत्र्याचा सर्वगामी अंत झालेलाही अनुभव त्यांना आला. मोठमोठ्या शेती क्षेत्राचे नियंत्रण करणार्‍या गहंपतींची निर्मिती आणि तिच्यावर उत्पादन करणार्‍या, श्रमणार्‍या दास-दासी यांच्या गडगंज धनिक बनणार्‍या या नव्या शोषकांची व्यवस्थासुद्धा त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. यात स्त्रियांना शोषणाचे जीवन भोगावे लागत होते. अशा दु:खमय परिसरात जगणार्‍या स्त्रियांनी भिक्खू संघाकडे संघात प्रवेश द्या अशी मागणी केली. दु:खमुक्तीचा शोध घेणार्‍या आणि भिक्खूसंघांतर्गत स्वातंत्र्याचा, मेत्तेचा आणि करुणेचा व्यवहार करणार्‍या या खास प्रवाहात त्यांना जावेसे वाटणे साहजिकच होते. त्यांना बर्‍याच चर्चेअंती प्रवेश मिळाला आणि त्यांनी तो सार्थ करून दाखवला.

विसाव्या शतकाच्या आधुनिक युगामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माच्या स्वीकाराचा निर्णय जनतेला बरोबर घेऊन केला. नव्या काळात बुद्ध धम्माच्या मूळ मांडणीकडे ‘अत्त दीप भव’च्या भूमिकेतून पाहून नवयान बुद्ध धम्माचा प्रस्ताव ठेवला. जातीव्यवस्थेचा अंत करण्यासाठी भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचा अंत करण्याची भूमिका त्यांनी मांडली. आंतरजातीय लग्ने, जातवार वस्त्यांचा अंत, जात म्हणून सक्तीने कराव्या लागणार्‍या कामांना नकार, नव्या उत्पादन शक्तींचे स्वागत अशा अनेक मार्गांचा जरी अवलंब केला तरी जातीव्यवस्था संपणार नाही असे त्यांनी मांडले. प्रत्यक्ष माणसा-माणसातल्या संबंधांमधून जातीय शोषणाची उतरंड सतत पुनर्निर्मित होत असते.

पण त्याबरोबरच ती एक मनोसंकल्पनासुद्धा आहे. तिचाही शेवट केल्याशिवाय जाती संपणार नाहीत असे विश्लेषण त्यांनी केले. संस्कृती, धर्म, परंपरा या क्षेत्रात आमुलाग्र बदल असाच त्याचा अर्थ होतो. हे साध्य करण्यासाठी त्यांना बुद्ध धम्माच्या स्वीकाराशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही. जातीअंत, वर्गअंत आणि धम्माचा स्वीकार अशा तीन पदरी परिवर्तनाच्या चळवळीतून केवळ पुरुषांचेच नाही, तर ज्यांचे अनेक अंगांनी शोषण होते त्या स्त्रियांचेही दु:ख संपवण्याकडे, सब्ब मंगल परिस्थितीकडे वाटचाल करण्याचे धोरण घेऊन बाबासाहेबांनी नेतृत्त्व केले. बौद्ध झालेल्या जनतेतील त्रुटी ध्यानात घेऊनही आपल्याला आज अगदी स्पष्ट दिसते की, बाबासाहेबांच्या या मार्गदर्शनाप्रमाणे धम्माचा स्वीकार केल्यानंतर इतर स्त्रियांपेक्षा बौद्ध समाजातल्या स्त्रिया जास्त धीट, जास्त हुशार, पुरुषांबरोबरीनेच नाही तर त्यांच्याही पुढे जाऊन स्वत:च्या स्वातंत्र्याचा हक्क बजावत आहेत.

त्या साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात जास्त पुढारलेल्या दिसतात. याचा अर्थ दु:खमुक्तीची चळवळ आज थबकलेली नाही, असा नाही. पण तिने वेग घेण्यासाठीची मुख्य ऊर्जा ही याच प्रबुद्ध जनतेतून येऊ शकते. मी चळवळीत काम करताना हे सर्व अनुभवले आहे. मला स्वत:ला मुक्तीवादी भूमिकेचा विकास करण्याच्या प्रक्रियेत बुद्ध धम्माच्या अंत:शक्तीची भरपूर मदत होत असते. चळवळीचा वेग आपोआप वाढणार नाही. कारण अनेक अडचणी आहेत. आता जन्मामुळेच केवळ बौद्ध असणारी संख्या वाढली आहे. बाबासाहेबांची वैचारिक ग्रंथसंपदा वाचून व्यवहार करणारे दुर्मिळ बनताहेत. त्यांचे ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे पुस्तक वाचणारे कमी दिसताहेत.

‘त्रिसरण-पंचशील’चा अर्थ माहीत नसताना केवळ उपचार म्हणून म्हणणारांची संख्या जास्त आहे. इतर जातींपर्यंत बुद्ध पोहोचवण्याचे कार्य करणारे फारसे कुणी दिसत नाहीत. आपण बौद्ध आहोत या आत्मसंतुष्टतेत राहण्याची अस्मिता दुराभिमानापर्यंत पोहोचू शकते. त्यातून ते इतरांपासून (इतर शोषितांपासून) तुटण्याची भीती आहे. याची सर्वात जास्त हानी स्त्रीमुक्ती चळवळीला होणार आहे. ज्यांचे दु:ख सर्वांगीण आहे त्या स्त्रियांना यातून पुढे जाण्यात अडथळा होऊ शकतो. म्हणूनच आता स्त्रियांनीच पुढाकार घेऊन बुद्ध धम्माची चळवळ व्यापक करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. डॉ. गेल ऑमव्हेट (“कल्चरली करेक्ट” या पुस्तकातून)


       
Tags: Babasaheb AmbedkarBuddhist conversioncaste abolitionequalityGail OmvedtNavayana BuddhismSocial JusticeWomen
Previous Post

विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट
बातमी

बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

by mosami kewat
October 3, 2025
0

(सतत नकारात्मक चष्मे घेतलेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या कानाखाली आवाज काढणारी गेल ऑम्वेट यांची लेखणी. बौद्ध धम्मालाही धर्माच्या चौकटीत बसवून आरोप करणाऱ्या...

Read moreDetails
विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

October 3, 2025
औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात!

औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात! २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी महाविहार

October 3, 2025
नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप

नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप

October 3, 2025
अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

October 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home