उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात दिवाळीपूर्वी साजरा झालेल्या भव्य दीपोत्सव सोहळ्याने पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. सरयू नदीच्या किनारी एकाच वेळी २६.१७ लाख दिवे प्रज्वलित करून आणि २,१२८ लोकांनी एकत्र आरती करून दोन नवीन विश्वविक्रम स्थापित करण्यात आले. राम नगरी दिवाळीच्या एक दिवस आधी २८ लाख दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. मात्र, या दिमाखदार सोहळ्याची चर्चा फिकी पडली ती दिवे विझल्यानंतर समोर आलेल्या एका विदारक दृश्यामुळे.
दीपोत्सव झाल्यावर दिवे विझताच, सरयू नदीच्या घाटांवर आजूबाजूला राहणाऱ्या गरीब लोकांनी दिव्यांमध्ये उरलेले मोहरीचे तेल (सरसोंचे तेल) गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली. लहान मुले, महिला, तरुण आणि वृद्ध लोक हातात डबे घेऊन हे तेल जमा करताना दिसले. पोलिसांच्या धास्तीने लोक घाईघाईने तेल भरतानाचे छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. काही नागरिकांनी हे तेल ६ महिने खाण्यासाठी उपयोगी पडेल, अशी प्रतिक्रिया दिली.
मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांना क्रीडा युवा धोरण समितीच्या सदस्य पदावरून दूर करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी
एकीकडे विश्वविक्रमासाठी केलेली कोट्यवधींच्या दिव्यांची रोषणाई आणि दुसरीकडे त्याच दिव्यांतील उरलेले तेल जमा करण्यासाठी गरिबांची लागलेली रांग, यामुळे उत्तर प्रदेशातील (यूपी) गरीब आणि महागाईने त्रस्त असलेल्या जनतेची खरी परिस्थिती समोर आली आहे.
हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. “विश्वविक्रम करण्यासाठी ओतलेला हा पैसा जर गरिबांसाठी खर्च केला असता, तर आज हे चित्र पाहण्याची वेळ आली नसती,” अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. तसेच, “दीपोत्सवासाठी वापरलेले हेच तेल गरिबांना वाटायला हवे होते,” अशी मागणीही काही नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या मते, हा झगमगाट केवळ वरवरची श्रीमंती दाखवून गरिबीच्या वास्तवावर पडदा टाकण्याचे काम करत आहे.
अयोध्या दीपोत्सवाचा भव्य समारंभ आणि त्यानंतरचे हे हृदयद्रावक चित्र यामुळे उत्तर प्रदेशातील गरिबांच्या अवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.