कोल्हापूर – गडमुडशिंगी ता. करवीर येथील बौद्ध समजातील शाळकरी मुलांना गावातील चौकातून तुम्ही जायचे नाही असे म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच चौकातून ये – जा करण्यास बंदी घालण्यात आली.
या प्रकरणामध्ये बौद्ध समाजातील चार मुले गंभीर जखमी झालेली असून, त्यांच्यावर गांधीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ४ आरोपीना अटक करण्यात आली असून, गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. घटनास्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी गांधीनगर सेवा रुग्णालयात जाऊन जखमी मुलांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गांधीनगरमध्ये आल्याचे समजताच गांधीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक जाधव, डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर हेही दाखल झाले. या वेळी सर्व आरोपींना तत्काळ अटक करून ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर शहर महासचिव मल्हार शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष भीमसेन राजमाने, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, करवीर सचिव अर्जुन गोंधळी, करवीर महासचिव विश्वास फरांडे, तानाजी काळे आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचणे , जिल्हा सह सचिव जयेश कांबळे, प्रताप तराळ, संतोष कांबळे, सुकुमार कांबळे, प्रवीण कांबळे, रवि कांबळे, भारत कांबळे, मनोज कांबळे, रमेश पोवार आदी उपस्थित होते.