अमरावती : बुद्धगया (बिहार) येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सुपूर्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तिवसा तालुक्यातील बौद्ध जनतेने पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी 20 ऑगस्टपासून सुरू केलेल्या जनजागृती अभियानाला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाचा समारोप 5 सप्टेंबर रोजी बोर्डा येथे होणार आहे.
तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली, त्या पवित्र महाबोधी महाविहारावर सध्या मनुवादी लोकांचे नियंत्रण आहे, असा आरोप करत भिक्खू संघ अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहे. देशभरात या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला होता.
याच पार्श्वभूमीवर, तिवसा तालुक्यातील बौद्ध जनतेला या आंदोलनाशी जोडण्यासाठी सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत विविध गावांना भेटी देऊन बुद्ध विहारांतील उपासक आणि उपासिकांकडून स्वाक्षऱ्या घेण्यात येत आहेत. सर्वांनीच महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समूहाकडे असावे, अशी भावना व्यक्त केली आहे.
आतापर्यंत वरखेड, चांदुर ढोरे, ठाणा ठुनी, काटसुर, नमस्कारी, जावरा, फत्तेपुर, करजगाव, निंभोरा, डेहणी, शेंदूरजना बाजार, तळेगाव ठाकूर, उंबरखेड, धामंत्री या गावांत हे अभियान पोहोचले आहे. पुढील टप्प्यात 5 सप्टेंबरपर्यंत भांबोरा, पालवाडी, सातरंगाव, वरुडा, दापोरी, भारसवाडी, आखतवाडा, मूर्तिजापूर (तरोडा), मारडा, कुऱ्हा, चेनुष्ठा, जहागीरपूर आणि कौडण्यपूर या गावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, सचिन जोगे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे भारत दहाट, मनीष खरे, सागर गोपाळे, नितीन थोरात, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, डॉ. धर्मेंद्र दवाळे आणि इतर कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.
Mahabodhi Mahavihara Protest : मुंबईत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!
मुंबई - महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज मुंबईत भव्य...
Read moreDetails