नाशिक पोलीस आयुक्तांची वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाकडून भेट
नाशिक : शहरात वडार समाजातील तरुण राहुल धोत्रे याची हत्या माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे व वडार समाज नेते अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकाचा राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस यंत्रणा कारवाई करत नसल्याचा आरोप करत, पीडित धोत्रे कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली होती.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः पीडित कुटुंबीयांशी चर्चा केली होती. त्यांनी न्याय मिळेपर्यंत शक्य ती मदत व कायदेशीर साहाय्य पक्षाकडून उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, आरोपी उद्धव निमसे काल अखेर पोलिसांच्या ताब्यात शरण आला. या घडामोडीनंतर जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी पुन्हा एकदा धोत्रे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्यासह नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
यावेळी गांगुर्डे म्हणाले, “बाळासाहेब आंबेडकरांनी सदैव वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. परभणी येथे वडार समाजातील आंबेडकरवादी तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणीही ते स्वतः न्याय मिळवून देण्यासाठी केस लढत आहेत. वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद असून, या प्रकरणात देखील न्याय मिळेपर्यंत आम्ही धोत्रे कुटुंबाच्या सोबत आहोत.”
यावेळी मयत राहुल धोत्रे यांचे वडील राजू धोत्रे, भाऊ आकाश धोत्रे, वडार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गुंजाळ, बाळासाहेब जाधव, युवा आघाडीचे शहर सदस्य मनोज उबाळे तसेच वडार समाजातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.