अकोला- लालाजी उपाख्य गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी लालाजींच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. विनयकुमार पाराशर, सुभाष पटनायक आदी नेत्यांची चर्चा यावेळी झाली. अकोल्यातून रेल्वेतून जातानांची डबा पार्टी असो की, दिल्लीत सहभोजन असो असा या विषयांना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उजाळा दिला. यावेळी लालाजींचे मुले कृष्णा शर्मा, अनुप शर्मा, निलेश देव, विकास सदांशिव यांची उपस्थिती होती.
आमदार गोवर्धन शर्मा हे अजातशत्रु होते त्यांचे सर्व पक्षातील राजकीय नेत्यांसोबत घनिष्ठ मैत्री होती. अशी आठवण वंचित नेते अॅड.आंबेडकर यांनी सांगितली. गेल्या काही काळात राजकीय नेत्यांमध्ये राजकीय विरोधामुळे संवाद नाही. तो संवाद आधी चांगला होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही संवादाची होती. पण, त्याचा थोडा विसर नव्या पिढीला झाला आहे. सामान्य व्यक्ती सोबत थेट संवादात लालाजी सर्व नेत्यांच्या पुढे होते. त्यांच्या इतका थेट लोकसंवाद आणि संपर्क आजच्या नेत्यांमध्ये अभावानेच दिसतो. युवकांशी देखील लालाजींचा अधिक संवाद होता. त्यामुळेच युवापिढीमध्ये देखील लालाजींनी जवळीक निर्माण केली होती. लालाजींच्या अकाली निधनाबद्दल यावेळी अॅड.आंबेडकर यांनी तीव्र दूःख व्यक्त केले.