अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग १३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मतदारांशी संवाद साधला. “अकोल्याचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शहरवासीयांनी आता एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, अकोला शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. शहरातील गटार व्यवस्था, रस्त्यांची दुरावस्था आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. वंचितची सत्ता आल्यास महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर दिला जाईल.

मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या अकोलेकरांना न्याय देण्यासाठी ‘वंचित’च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अकोला येथे पार पडलेल्या अंजलीताई यांच्या सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

या प्रचार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधती शिरसाठ, राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर आणि ज्ञानेश्वर सुलताने यांची प्रमुख उपस्थिती होती.






