अकोला : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन भव्य धम्म मेळाव्यात बोलताना आरक्षण आणि दलित, वंचित, आदिवासी समाजातील युवकांच्या हत्येवरून अत्यंत आक्रमक भूमिका मांडली.
सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, ते देशातील आरक्षण वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहतील. कोणी सोबत असले तरी लढेल, कोणी सोबत नसले तरी लढत राहील! अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
‘मनुवाद्यांकडून उच्चशिक्षित युवकांची हत्या‘
यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, गेल्या 10 वर्षांत दलित, वंचित, आदिवासी समाजातील अनेक उच्चशिक्षित हुशार युवकांचा येथील जातीयवादी लोकांनी जीव घेतला. या युवकांची प्रगती मनुवाद्यांच्या डोळ्यात खुपत होती, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली.
या हत्येच्या घटनांची यादी देताना त्यांनी खैरलांजी हत्याकांडातील पीडित भोतमांगे कुटुंब, शहीद डॉ. रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी, विराज जगताप, नितीन आगे, अरविंद बनसोड, अक्षय भालेराव, आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा उल्लेख केला. ह्या मनुवाद्यांनी अनेकांचा जीव घेतला, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या वक्तव्याला जोरदार पाठिंबा दिला.