ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी केली. सोलापूर येथे दि.१९ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे आज ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सभागृह बरखास्त न करता फक्त सरकार बरखास्त करण्यात यावे असे निवेदन वंचित बहुजन आघाडी तर्फे राज्यपालांना दिले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ती कार ज्यांच्या मालकीची होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे खाडीत सापडला, मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची ट्रान्सफर होमगार्ड विभागात करण्यात आली. ट्रान्सफर करण्यात आल्यावर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना इ-मेल पाठवला, या इ-मेल मध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचे कलेक्शन करण्याचे टार्गेट दिले होते असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. राज्यात सुरु असलेल्या या अत्यंत भयानक अश्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे राज्य सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
‘हे सरकार चोरांचे आणि खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे’ असा सरळ आरोप ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. राज्यपालांना निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धनराज वंजारी सुद्धा उपस्थित होते.