शाळेच्या मान्यता रद्द कराव्यात ‘वंचित’ च्या योगेश बन यांची मागणी
औरंगाबाद : पालकांनी विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तकं आणि युनिफॉर्म शाळेतूनच घ्यावे किंवा आम्ही सांगू त्या दुकानातूनच घ्यावेत, अशी सक्तीच इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी केली असल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना निवेदन दिले आहे.
विशिष्ट प्रकाशकांचे शैक्षणिक साहित्य, लोगो असलेला युनिफॉर्म, स्कूलबॅग, शूजचा स्वतंत्र पॅटर्न या शाळांनी तयार केला आहे. हे साहित्य शाळांव्यतिरिक्त ठराविक दुकानांमध्येच मिळते. त्यांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा असतात. या माध्यमातून विक्रेते आणि या शाळा प्रचंड नफेखोरी करत आहेत. काही शाळा ठराविक दुकानातूनच पुस्तके युनिफॉर्म खरेदीची सक्ती करत असल्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 16 जून रोजी परिपत्रक काढून अशा शाळाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. शाळा व्यवस्थापनाने अशा पद्धतीने नफेखोरी करू नये, असे अस्तिककुमार पांडे यांनी आपल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र शिक्षण विभागाने व शाळांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
अस्तिककुमार पांडे यांच्या परिपत्रकावर अंमलबजावणी करून कुठल्याही मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमातील शाळांनी अशा प्रकारची कुठलीही सक्ती करू नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी अशा शाळांनी सक्ती करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत. अशी सक्ती कोणी करत असेल तर पालकांनी आमच्याकडे तक्रार करावी आम्ही संबंधित शाळांवर कारवाई करू असे आश्वासित केले आहे.
वंचित बहुजन आघाडी सदरील पूर्ण विषयात जातीने लक्ष देऊन प्रत्येक शाळेवर लक्ष ठेवून सक्ती होत असल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्याकडे करण्यात आली. पक्षामार्फत केलेल्या सर्व मागण्याही मान्य करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, महासचिव मिलिंद बोर्डे, संघराज धम्मकीर्ती, मंगेश निकम, सचिव शेख नूर मोहंमद, संघटक सुभाष कांबळे, प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, कोषाध्यक्ष गोविंद सुरवसे, संपर्कप्रमुख गणेश खोतकर, सोशल मीडिया प्रमुख प्रवीण जाधव, सदस्य रवी रत्नपारखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.