पुणे: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध विचारवंत आणि प्रख्यात संशोधक आचार्य रतनलाल सोनग्रा (८७) यांचे रविवारी दुपारी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. रतनलाल सोनग्रा यांच्या निधनामुळे साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. समाजसुधारकांच्या विचारांचा एक प्रखर वारसा देणारा मार्गदर्शक आज हरपला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
मानवतावादी समाजसुधारकांच्या विचारांचा एक मोठा भाष्यकार आणि आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक हरपल्याची भावना साहित्य व सामाजिक वर्तुळात व्यक्त होत आहे.
सोनग्रा यांच्या कन्या आरती सोनग्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या (सोमवार) सकाळी ९ ते १०:३० वाजेपर्यंत त्यांच्या विमाननगर येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता येरवडा विद्युत दाहिनी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
साहित्यातून सामाजिक परिवर्तनाचा जागर
आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार सातत्याने मांडला.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी साहित्याच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले. प्रामुख्याने बौद्ध साहित्य आणि मानवतावादी समाजसुधारकांच्या कार्यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. समता आणि मानुसकी हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू राहिला.
‘सोनजातक’ – साहित्यातील मैलाचा दगड सोनग्रा यांची ग्रंथसंपदा अत्यंत समृद्ध आहे.
यात प्रामुख्याने खालील साहित्याचा समावेश होतो:
सोनजातक: त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित १४ भागांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथसंच, जो साहित्य क्षेत्रातील एक मैलाचा दगड मानला जातो.
कबीर वाणी: संत कबीरांच्या विचारांवर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ.
तिमिरातुनी तेजाकडे: प्रबोधनाचा विचार मांडणारा प्रख्यात ग्रंथ.
विचारांचा वारसा
महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ एक लेखकच नाही, तर संशोधक आणि तत्त्वनिष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.






