गडचिरोली : आरमोरी नगरपरिषद क्षेत्रात शाळा, अभ्यासिका व कोणत्याही प्रकारच्या शिक्षण सुविधा उपलब्ध नसताना नागरिकांकडून शिक्षण कर आकारला जात असल्याने वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरपरिषद कार्यालयावर धडक देत मुख्याधिकारी व तहसीलदार मार्फत नगरविकास मंत्र्यांना निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेत, सन २०१८ पासून आजपर्यंत नगरपरिषदेकडून नागरिकांच्या करातून एक रुपयाही शिक्षणासाठी खर्च झालेला नसल्याचा आरोप करण्यात आला. नगरपरिषद क्षेत्रात शाळा नसतानाही कर आकारला जाणे ही नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक असल्याचे वंचित बहुजन महिला आघाडीने स्पष्ट केले. शिक्षण कर रद्द करून नागरिकांना शाळा, अभ्यासिका व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली.
या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांच्यासोबत जिल्हा महासचिव राजरत्न मेश्राम, उपाध्यक्ष भीमराव शेंडे, वडसा शहराध्यक्ष अशोक मेश्राम, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा मेश्राम, तालुकाध्यक्ष कुमता मेश्राम, शहराध्यक्ष लता बारसागडे, संध्या रामटेके, ज्योती उंदीरवाडे, ज्योती दहिकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.