ॲड. प्रकाश आंबेडकर : महाराष्ट्रात शांतता राहिली पाहिजे, हा आरक्षण बचाव यात्रेचा हेतू
नांदेड : सध्याची परिस्थिती चांगली नाही. छगन भुजबळ यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास नामांतर आंदोलनावेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती. तीच परिस्थिती आता मराठा-ओबीसींमध्ये झाल्याची दिसून येत असून हे दुर्दैव असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली. ते नांदेड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव यात्रेचा हेतू सांगताना म्हटले की, आरक्षण बचाव यात्रेचा हेतू शांतता प्रस्थापित राहणे हा आहे. वंचित बहुजन आघाडीशिवाय शांतता कोणीच प्रस्थापित करु शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रात भीतीचे वातावरण आहे, असे मला वाटते.
काही राजकीय पक्ष आता पळवाटा काढत आहेत. तुम्ही जरांगेना काय शब्द दिला तो सांगा, लक्ष्मण हाके यांना काय शब्द दिला तो सांगा, असे प्रश्न उपस्थित करत आहेत. आमचे म्हणणं सरळ आहे प्रत्येक पक्षाला स्वत: ची भूमिका असणे आवश्यक आहे. जरांगे पाटील जी मागणी करत आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, प्रश्न एवढाच आहे की द्यायचा की नाही द्यायचा. महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी राजकीय पक्ष आपला निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा बाळगत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले.
ॲड. आंबेडकर प्रस्थापित पक्षांना धारेवर धरताना म्हणाले की, जनमाणसामध्ये जी भावना आहे ती म्हणजे एनसीपी आणि काॅंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहे. तसेच, भाजप हा वैदिक ब्राम्हणांचा पक्ष आणि शिवसेना (उबाठा) हा सीकेपीचा पक्ष आहे. याचा अर्थ ओबीसी समाजाशी यांचा संबंध नाही. हे भूमिका घेणार नसतील. तर यांना मागसावर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय आणि न राहिले काय याच्याशी काहीही देणं-घेणं नाही.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की राजकारणामध्ये जातीयतेचे राजकारण प्राबल्य होणार नाही याची दक्षता घ्या. उलट आता जातीय राजकारण प्रबळ होत आहे आणि हा धोका आहे, असे मला वाटते.