दिल्ली : दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांना एका ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज, शुक्रवारी ही धमकी मिळाल्यानंतर दोन्ही न्यायालयांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. तातडीने सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आले असून, परिसरात कसून तपासणी सुरू आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाला मिळालेला ईमेल
दिल्ली उच्च न्यायालयाला मिळालेल्या धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, न्यायालयाच्या आवारात, विशेषतः न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आणि इतर भागात तीन स्फोटके ठेवण्यात आली आहेत. दुपारच्या नमाजानंतर स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, दुपारी २ वाजेपर्यंत परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले होते.
धमकीचा ईमेल ‘kanimozhi.thevidiya@outlook.com’ या पत्त्यावरून आला आहे. या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, ‘२०१७ पासून आमचे लोक पोलिसांमध्ये घुसले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात आज होणाऱ्या स्फोटाने मागील खोटे दावे स्पष्ट होतील. दुपारच्या नमाजनंतर लवकरच न्यायाधीशांच्या कक्षात स्फोट होईल.’
या ईमेलनंतर त्वरित कारवाई करत दिल्ली उच्च न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला. न्यायाधीश आणि वकिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि परिसराची कसून तपासणी करत आहेत.
दिल्ली पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दोन्ही शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.