पुणे : पुत्रप्राप्ती करून देतो असे सांगून एका महिलेकडून तब्बल ३ लाख १५ हजार रुपये उकळणाऱ्या एका भोंदूबाबास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हा भोंदूबाबा अंगारा देण्याच्या बहाण्याने महिलेला फसवून तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेत होता. विशेष म्हणजे, यासाठी पीडित महिलेला आपले मंगळसूत्रही विकावे लागले.
या प्रकरणी गिरीश बलभीम सुरवसे (वय ३६, रा. भोसरी) याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहित महिलेला लग्नानंतर अपत्य होत नव्हते. वैद्यकीय उपचारादरम्यान, तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला गिरीश सुरवसे याच्याबद्दल सांगितले. सुरवसेकडे ‘सिद्धी’ असल्यामुळे तो पुत्रप्राप्ती करून देईल, असा विश्वास तिला दिला. यावर विश्वास ठेवून ती सुरवसेकडे गेली. सुरवसेने तिला अंगारा दिला आणि लवकरच पुत्रप्राप्ती होईल असे सांगून तिच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यास सुरुवात केली.
या भोंदूगिरीसाठी महिलेने आपले मंगळसूत्र विकले आणि ते पैसे आरोपीला दिले. जेव्हा ही बाब महिलेच्या पतीला समजली, तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सुरवसेला अटक केली आहे. आरोपीने अशाप्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक केली असण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली.