पुणे : पुण्यामध्ये आयकर परतावा घोटाळा उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा घोटाळा सुमारे ५०० कोटी रुपयांचा असून, यात अनेक खासगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हजारो कर्मचारी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. याप्रकरणी आयकर विभाग संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आयकर रिटर्न भरण्याचे काम करणाऱ्या एका टोळीने हा मोठा घोटाळा केला आहे. या टोळीने अनेक नोकरदारांना त्यांच्या उत्पन्नावर जास्तीत जास्त कर परतावा (Tax Refund) मिळवून देण्याचे आमिष दाखवले. गेल्या ५ वर्षांपासून ही टोळी पुण्यात सक्रिय होती. त्यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचे आयकर रिटर्न भरले आहेत. यात बहुतांश खासगी आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारे पगारदार कर्मचारी आहेत.
या रॅकेटने कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही कागदपत्रांशिवाय, केवळ बोगस दावे दाखवून रिटर्न भरले. यामध्ये गृहकर्जाचे व्याज आणि मुद्दल परतफेड, वैद्यकीय खर्च, विमा प्रीमियम, शैक्षणिक कर्ज, आणि घरभाडे भत्ता (HRA) यांसारख्या बाबींमध्ये चुकीची माहिती भरून क्लेम वाढवले होते.
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, हे एक संघटित रॅकेट होतं, ज्याने जुन्या फाइलिंग सिस्टीममधील त्रुटींचा फायदा घेतला. मात्र, आता नवीन सिस्टीममध्ये या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवरही आयकर विभाग कारवाई करणार आहे. त्यामुळे, कर परताव्याच्या या फसवणुकीत अडकलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.