नेपाळ : नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तरुणाईमध्ये मोठा संताप उसळला आहे. या बंदीच्या निषेधार्थ हजारो तरुण रस्त्यावर उतरले असून, त्यांचे आंदोलन आणखी पेटले आहे. या आंदोलनांमुळे नेपाळची राजधानी काठमांडू हादरली असून, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या घरालाही आंदोलकांनी घेराव घातला आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, विशेषतः तरुणांमध्ये. देशातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ऑनलाइन आहे, आणि १६ ते २५ वयोगटातील तरुण यात आघाडीवर आहेत. सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) सारख्या २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारने सांगितले की, द्वेषपूर्ण आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी तसेच फसवणुकीचे गुन्हे थांबवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
या बंदीनंतर, सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या तरुणाईमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला, कारण याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम झाला. याचा परिणाम म्हणून, काठमांडूमधील मैतीघर मंडाला येथून निदर्शनांना सुरुवात झाली. हे निदर्शक संसद भवनाजवळ पोहोचल्यावर त्यांनी बॅरिकेड्स तोडून आत प्रवेश केला, ज्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.
या हिंसाचारात आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत. सरकारने ही बंदी उठवली असली, तरी तरुणाईचा संताप कमी झालेला नाही, आणि आंदोलन आणखी तीव्र होत आहे. या हिंसक निदर्शनांमुळे नेपाळमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.