गडचिरोली : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी तालुक्यात गाव बांधणी आणि लोकसंपर्क दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या दौऱ्यात पक्षाने तालुक्यातील विविध गावांमध्ये सभा घेऊन आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
नवेगाव, मुरखडा, सगणापूर, आंबोली, येणापूर, अनखोडा, आष्टी यांसारख्या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. या निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आणि पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे यांनी केले.
यावेळी सभेला जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, जिल्हा महासचिव मंगलदास चापले, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ दुधे, ज्येष्ठ कार्यकर्ते देवानंदजी दुर्गे, तालुका उपाध्यक्ष सुधाकर रामटेके, महिला प्रतिनिधी जया रामटेके, आष्टी सर्कल प्रमुख छोटुभाऊ दुर्गे, ज्येष्ठ कार्यकर्ते झाडे साहेब, भंतेशजी निमसरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या विचारांची देवाणघेवाण करत गाव पातळीवर पक्ष मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.