मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील हवामानाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. राज्याच्या विविध भागांत, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात, मान्सून सक्रिय आहे. येत्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात ‘रेड अलर्ट’
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क चे आदेश देण्यात आले आहे.
राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातही पावसाचा जोर वाढणार असून नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
देशभरातील पावसाची स्थितीराजस्थान आणि तेलंगणा:
डोंगराळ प्रदेशांव्यतिरिक्त राजस्थान आणि तेलंगणामध्येही जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेलंगणामधील कामारेड्डी आणि मेडक जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांत ५० वर्षांचा विक्रम मोडणारा पाऊस झाला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दिल्ली-एनसीआर: दिल्ली आणि एनसीआरमध्ये जोरदार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अनेक रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली आहे. हवामान विभागाने आजही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कमाल तापमान ३० अंश सेल्सियस तर किमान तापमान २३.५ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
एकूणच, देशभरात मान्सून सक्रिय असून, अनेक ठिकाणी पूर, अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.