हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा, हिंगोलीने निशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेपुढे आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 ची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सदर जीआरनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ज्योतिपाल रणवीर, युवक जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे, युवक जिल्हा संघटक निखिल कवाने, युवा नेते अक्षय इंगोले, माथाडी कामगार प्रभारी राजरत्न बगाटे, जिल्हा सहसचिव लखन खंदारे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी शासनाने तातडीने मागण्या मान्य करून जीआरची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.