नाशिक : येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याच्या वतीने पक्ष संघटन बांधणी व आढावा बैठक रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविणे, सभासद नोंदणी वाढविणे, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणे आणि बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणे यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक विभाग, प्रभाग आणि वार्ड स्तरावर स्वतंत्र कार्यकारीनी गठीत करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. तसेच शहर कार्यकारीनी नव्याने गठीत करण्यासाठी मुलाखती घेऊन कामाच्या जोरावर कार्यकर्त्यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत विभागवार मेळावे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करून नगरसेवकांची निवड करून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा मनपात फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, युवा आघाडी महानगरप्रमुख रवि पगारे, तसेच विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आझाद समाज पार्टीचे बंटी थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्षाला बळ दिले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा महासचिव ॲड. विनय कटारे यांनी केले तर आभार युवा आघाडी शहर महासचिव दिपक पगारे यांनी मानले.