पुणे : कोथरूड प्रकरणातील तीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अन्यायकारकपणे खोटे गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर आज, दिनांक २३ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भेट घेतली.
पोलिसांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सागर नामदेव आल्हाट, महिला आघाडी महासचिव ऍड. रेखाताई चौरे व युवक आघाडी उपाध्यक्ष स्वप्निल वाघमारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आज सर्व जणांनी पुण्यात बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली.
यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना विश्वास देत, “संपूर्ण आंबेडकर कुटुंब आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका” असे सांगितले.
“न्यायाच्या प्रत्येक कायदेशीर लढ्यात मी तुमच्यासोबत आहे आणि गोर-गरीब, वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे.”
या पाठींब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आंबेडकर कुटुंबाचा मायेचा हात आणि न्यायासाठी मिळालेला पाठिंबा यामुळे उपस्थितांच्या या लढ्यात बळ मिळाल्याचे सांगितले.