पुणे : कोथरूड पोलिसांनी तरुणींना मारहाण केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणींवर आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी नुकतेच गुन्हे दाखल केले आहेत.
या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. कोथरूड पोलिसातील आरोप असलेल्या पोलिसांवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी दिलेली वागणूक ही अतिशय अमानवीय आणि अन्यायकारक असून रक्षकच भक्षक झाले आहेत.
कोथरूड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या नावाखाली वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सागर आल्हाट, वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे शहर महासचिव ऍड रेखाताई चौरे,वंचित बहुजन युवा आघाडीचे स्वप्नील वाघमारे, श्वेता पाटील, ऍड परिक्रमा खोत आणि इतर तिघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि पीडित तरुणींनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या प्रकरणी पीडितांसोबत वंचित बहुजन आघाडी न्यायालयीन लढाईत सोबत असेल व यापुढे याविरोधात आम्ही लढा देऊ, असे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
1 ऑगस्ट 2025 रोजी, तीन मुलींनी कोथरूड पोलिसांनी मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती.
पोलिसांनी तपास करताना “तुम्ही महारा-मांगाच्या पोरी आहात”, “किती मुलांसोबत झोपल्या आहात”, “तुम्ही लेस्बियन आहात का?” असे प्रश्न विचारल्याचा आरोप या मुलींनी केला होता.
या आरोपांनंतर, या मुली आणि त्यांचे सहकारी आक्रमक झाले. त्यांनी कोथरूड पोलिसांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये पूर्णवेळ वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, श्वेता पाटील, परिक्रमा खोत आणि इतर 50 ते 60 सहकाऱ्यांसह उपस्थित होते.