बंगळूरु : अंमलबजावणी संचालनालय (ED) ने कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने केलेल्या देशव्यापी कारवाईत त्यांच्या ठिकाणांवरून कोट्यवधी रुपयांची रोकड, परदेशी चलन आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे हा गुन्हा अधिक गंभीर असल्याचे समोर येत आहे.
ईडीच्या बंगळूरु प्रादेशिक कार्यालयाने २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विविध राज्यांमध्ये, ज्यात बंगळूरु, गंगटोक, चित्रदुर्ग, हुबळी, जोधपूर, मुंबई आणि गोवा यांचा समावेश आहे, एकूण ३१ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ५ कॅसिनोचाही समावेश होता.
नेमके प्रकरण काय?
हे प्रकरण आमदार के. सी. वीरेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजी (बेंटिग) संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, आरोपी ‘किंग ५६७’, ‘राजा ५६७’, ‘पपीज ००३’ आणि ‘रत्ना गेमिंग’ यांसारख्या नावांनी अनेक ऑनलाइन सट्टेबाजी साइट्स चालवत होता.
याशिवाय, वीरेंद्र यांचा भाऊ के. सी. थिप्पेस्वामी दुबईतून ‘डायमंड सॉफ्टेक’, ‘टीआरएस टेक्नॉलॉजीज’, आणि ‘प्राइम९ टेक्नॉलॉजीज’ यांसारख्या व्यावसायिक संस्था चालवतो. या कंपन्या के. सी. वीरेंद्रच्या कॉल सेंटर सेवा आणि गेमिंग ऑपरेशन्सशी संबंधित असल्याचे आढळले आहे.
छाप्यात सापडलेले घबाडईडीच्या या धडक कारवाईत जप्त करण्यात आलेली संपत्ती पाहून तपास यंत्रणाही थक्क झाली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- १२ कोटी रुपये रोख
- जवळपास १ कोटी रुपयांचे परदेशी चलन
- जवळपास ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने
- सुमारे १० किलो वजनाचे चांदीचे दागिने
- मर्सिडीजसह चार वाहने
- १७ बँक खाती आणि २ बँक लॉकर गोठवले
आमदार के. सी. वीरेंद्र यांचा भाऊ के. सी. नागराज आणि मुलगा पृथ्वी एन. राज यांच्या ठिकाणांवरून मालमत्तेची काही कागदपत्रे आणि आक्षेपार्ह दस्तऐवजही जप्त करण्यात आले आहेत. या मोठ्या कारवाईमुळे मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर सट्टेबाजीच्या प्रकरणांचे जाळे किती मोठे आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास ईडी करत आहे.