पुणे : इंदापूर तालुक्यात बाभुळगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे, ज्यामुळे स्थानिक आदिवासी पारधी कुटुंबांमध्ये भीती आणि निराशेचे वातावरण पसरले आहे. गेल्या तीस वर्षांपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांना कोणतीही पूर्वसूचना न देता, महसूल आणि पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करून विस्थापित केले आहे. या घटनेचा जाहीर निषेध वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पोलिस आणि महसूल अधिकारी बाभुळगाव येथील पारधी वस्तीवर पोहोचले. पावसाळ्याचे दिवस असतानाही, त्यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, महिला, मुले आणि वृद्धांसह अनेक नागरिकांना लाठीमार करून घराबाहेर काढले. या कारवाईमध्ये अनेक घरांची मोडतोड करण्यात आली आणि तरुण मुलांवरही मारहाण झाली. घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या घटनेचा निषेध करताना ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही दिवसांपूर्वीच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील भटक्या-विमुक्त तसेच आदिवासी समाजातील लोकांशी संवाद साधून त्यांचा गौरव केला होता. मात्र, त्यानंतर लगेचच अशाप्रकारे बळाचा वापर करून आदिवासी कुटुंबांना बेघर करणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
तसेच यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री आणि स्थानिक आमदारांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. लहान मुलांच्या रडण्याचा आणि लोकांच्या दुःखाचा आवाज हे इंग्रजांच्या राजवटीतही नव्हते, अशी भयावह परिस्थिती आता निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी राज्यपाल आयोग, महिला आयोग आणि आदिवासी आयोगाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दोषी पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत, वंचित बहुजन आघाडी या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.