औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नऊ महिन्यांपूर्वी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी द्यावीत, अशी मागणी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. मोकळे यांनी यावेळी शरद पवार यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांना त्यांच्या दाऊदसोबतच्या संबंधांबद्दल जाहीर प्रश्न विचारले होते. एका शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये त्यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, नऊ महिने उलटूनही शरद पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे मोकळे म्हणाले. शरद पवारांनी यावर स्पष्ट भूमिका मांडावी आणि ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊन जाऊ द्यावे, असे मोकळे यांनी सांगितले.
याचबरोबर, मोकळे यांनी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश न होण्यामागे भाजपने शरद पवार यांना ‘दाऊद सोबतच्या संबंधांची’ धमकी दिली होती का, असा थेट प्रश्नही विचारला. त्यांनी सांगितले की, आमचा सहभाग निवडणूकपूर्व युतीमध्ये होऊ शकला नाही, त्याचे कारण भाजपने शरद पवारांना त्यांचे दाऊद सोबत असलेले संबंध उघड करण्याची आणि त्या संदर्भात कारवाईची धमकी दिली होती का? याचे जाहीर उत्तर शरद पवारांनी द्यावे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यावरही मोकळे यांनी आदरपूर्वक प्रतिक्रिया दिली. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारलेला नाही, तर थेट शरद पवारांना प्रश्न विचारला आहे. त्यामुळे, त्याचे उत्तर शरद पवार यांनीच दिले तर ते अधिक योग्य ठरेल, असे मोकळे म्हणाले. या पत्रकार परिषदेला मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाट, रुपचंद गाडेकर, पंकज बनसोडे, संदीप जाधव, मिलिंद बोर्डे, रामेश्वर तायडे, पी. के. दाभाडे, सुभाष कांबळे, अंजन साळवे, पंडित तुपे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात पुढील ५ दिवस ‘धुवॉंधार’ पाऊस! २१ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील...
Read moreDetails