मुंबई : महान साहित्यिक, लोककवी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स (ट्विटर) च्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये, ‘समाजातील तळागाळातील लोकांच्या वेदना, संघर्ष आणि आशा यांना आपल्या शब्दांत उतरवणाऱ्या थोर साहित्यिक, लोककवी आणि क्रांतीकारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ असे म्हटले.
अण्णा भाऊ साठे यांच्या योगदानावर प्रकाश टाकताना, आंबेडकर म्हणाले की ते केवळ तमाशा, पोवाडे आणि लोककथांमध्ये रमणारे साहित्यिक नव्हते, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक महत्त्वपूर्ण लढवय्ये होते. ‘मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी’ त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पोवाड्यांनी जनतेच्या मनात स्वाभिमान जागवला.
यासोबतच, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या क्रांतिकारी कादंबरी ‘फकिरा’ चाही विशेष उल्लेख केला. ही कादंबरी आजही सामाजिक क्रांतीचा झंझावात उभा करते आणि वंचितांना त्यांच्या स्वाभिमानाची आठवण करून देते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आजच्या काळातही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार, त्यांची भाषा आणि त्यांचा लढाऊ बाणा अनेकांना नवीन संघर्षासाठी प्रेरणा देतो, असेही ते म्हणाले.
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले अण्णा भाऊ साठे यांना केले अभिवादन; ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार’ म्हणत केले स्मरण