एका धक्कादायक फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमधून पृथ्वी रिअल्टर्स अॅण्ड हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एका बँकेदरम्यान मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. बँकेने 87.5 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं, मात्र आश्चर्य म्हणजे ही रक्कम प्रत्यक्षात कधीच वितरित झाली नाही. तरीही, या कागदावरच्या कर्जावर व्याज आकारलं जात राहिलं, आणि आता त्याची रक्कम 150 कोटींहून अधिक झाली आहे!
कोणी केलं हे ऑडिट?
दीपक सिंघानिया अॅण्ड असोसिएट्स या चार्टर्ड अकाउंटंट्सनी ही महत्त्वपूर्ण ऑडिट तपासणी केली आहे. बँक आणि कंपनी यांच्यात सुरू असलेल्या लवादाच्या प्रकरणात सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
ऑडिटमध्ये नेमकं काय समोर आलं?
ऑडिटनुसार, पृथ्वी रिअल्टर्सला 87.5 कोटी रुपयांची ‘मॉर्गेज ओव्हरड्राफ्ट’ सुविधा मंजूर करण्यात आली होती. यासाठी वसई येथील 54 हजार चौरस मीटर नॉन-अॅग्रीकल्चरल जमीन गहाण ठेवण्यात आली होती. मात्र, 31 ऑक्टोबर 2012 नंतर या खात्यात कोणताही व्यवहार झाला नाही. ना निधी जमा झाला, ना खर्चाची नोंद दिसली.
हे प्रकरण जेव्हा लवादाच्या न्यायाधिकरणासमोर गेलं, तेव्हा पॅनेलने याला केवळ प्रशासकीय चूक मानलं नाही, तर ‘पूर्वनियोजित आर्थिक फसवणूक’ असल्याचं स्पष्ट केलं. म्हणजे, हे केवळ चुकून झालेलं नाही, तर जाणूनबुजून केलेला घोटाळा असल्याचं म्हटलं आहे.
आता पुढे काय होणार?
सध्या हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) मध्ये विचाराधीन आहे. लवकरच यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. कर्ज प्रत्यक्षात वितरितच झालं नसेल, तर त्याची वसुली करता येईल का, यावर कायदेशीर निर्णय अपेक्षित आहे. हा निर्णय या प्रकरणाची पुढील दिशा ठरवेल.
ग्राहकांवर परिणाम होईल का?
सध्या तरी हा एक तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा असल्याने, बँकेच्या ग्राहकांवर याचा तत्काळ कोणताही मोठा परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे. ग्राहकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता सध्या तरी खूप कमी आहे.
बँकेचा पसारा किती मोठा?
ही बँक एक मल्टी-स्टेट बँक असून तिची स्थापना 1983 मध्ये झाली आहे. देशभरात या बँकेच्या 137 शाखा आहेत, ज्या भारतातील सात ते आठ राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रात या बँकेच्या 100 शाखा आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सहकारी सोसायटी कायद्याअंतर्गत या बँकेवर नियंत्रण ठेवते.
महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही या बँकेच्या शाखा आहेत. बँकेची एकूण उलाढाल 1297 कोटी रुपये आहे. 2019 मध्ये बँकेला 99.69 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तरीही या बँकेचे लाखो ग्राहक आहेत. या प्रकारामुळे बँकिंग व्यवस्थेतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.