नांदेड – भोकर तालुक्यातील धारजणी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. सुमारे वीस लाखांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या तीन सीसी रस्त्यांचे (दोन 80 मीटर व एक 60 मीटर) भूमिपूजन नुकतेच मोठ्या जल्लोषात पार पडले.
याच कार्यक्रमात गाव शाखेचे उद्घाटन व सदस्य नोंदणी मोहीमही राबविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे (पालमकर) होते.
त्यांच्यासोबत युवा जिल्हाध्यक्ष आकाश जोंधळे, गजानन कांबळे, मीडिया प्रमुख अमर हत्तीआंबिरे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. “गाव तिथे शाखा, घराघरात सदस्य” या घोषणेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ बांधणी व सदस्य नोंदणी मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे.
धारजणीसह चित्तगिरीसारख्या भागातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. चित्तगिरी येथे झालेल्या सभेत जिल्हाध्यक्ष पालमकर यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. “बोगस मतदानाच्या जोरावर सत्तेवर आलेल्या सरकारने महिलांचे अनुदान थांबवले, पण स्वतःच्या घोटाळ्यांचे कोण व्हेरिफिकेशन करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा, विशेषतः महिलांचा, मोठ्या संख्येने सहभाग होता.
या प्रसंगी हिजायत खान पठाण (तालुकाध्यक्ष, हदगाव), दिलीप राव (भोकर), सुशील भालेराव, पत्रकार चंद्र, तेले साहेब, सरपंच चव्हाण, भीम शाहीर अशोक चौरे, शाहीर कैलासदादा राऊत, राजू गजभारे, बौद्ध महासभेचे गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
गाव विकासासाठी नवा अध्याय सुरू या उपक्रमामुळे वंचित बहुजन आघाडीला ग्रामीण जनतेशी थेट संपर्क वाढवण्यासाठी नवे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. विकास, हक्क आणि हक्कांसाठी लढणाऱ्या संघर्षशील शक्तींना गावागावात आधार देण्याचे कार्य वंचित बहुजन आघाडी प्रभावीपणे करत असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.