“भारत जोडो न्याय यात्रा समापन समारोह” सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर निशाणा !
मुंबई : भारत जोडो न्याय यात्रा समापन समारोह सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. एकटे किंवा सगळे मिळून लढूया पण लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. मोदी का परिवारवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. तसेच मोदी यांनी आधी स्वतःच्या पत्नीसोबत एकत्र रहावे, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.
फ्युचर गेमिंग कंपनी आहे, या कंपनीचा फायदा 200 कोटी आहे, तर 1300 कोटीचे बाँड या कंपनीने कुठून घेतले असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, मी अशा अनेक कंपन्यांची नावे सांगू शकतो, मग मोदींना या कंपन्यांना सवाल विचारला पाहिजे का नाही. लोकांनी विचारलं पाहिजे. ईडीने या कंपन्यांना विचारलं पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही.
मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाही. हिंदू धर्मामध्ये कुटुंबाबद्दल आपण प्रसार केला पाहिजे. त्यामुळे मोदींनी आपल्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, व्यक्तिगत मुद्दा आहे. पण या चर्चांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवात केली आहे. नॅशनल कल्चरबद्दल तेच बोलले होते, पण आता ते विसरले आहेत. त्यामुळे आता आपणच याचा प्रसार केला पाहिजे,असेही आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर म्हणाले, सध्या पश्चिम बंगालची वेगळी परिस्थिती आहे. तिकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात २००४ पासून लढत आहे. मी कायदेशीर लढा ही देत आहे. मशीन ही अमेरिकेमधून येत असते. या मशीनमध्ये जी चीप येते. ती 20 ते 25 रुपयांमध्ये मिळते. त्यामुळे यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो.
राहुल गांधी यांना माझी विनंती आहे की, ईव्हीएममध्ये फेरफार शक्य आहे, पेपर ट्रेलिंग आणि वोट यात फरक दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलं पाहिजे. पेपर ट्रेलिंग होऊ शकतं. राहुल गांधी यांनी आवाहन केलं पाहिजे, आम्ही सगळे तुमच्यासोबत एकत्र येऊ, असेही आंबेडकर यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.