अकोला: अकोल्यातील धनगर समाजाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथील यशवंत भवन, या त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे या बैठकीला विशेष महत्व असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात आणि देशात काही महिन्यांत लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी जोमाने कामाला लागली आहे. संवाद सभा, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आंबेडकर महाराष्ट्र पिंजून काढत असल्याचे दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जात आहे. अशातच अनेक समाजातील नेते ॲड. आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांत राज्याचे चित्र फक्त वंचित बहुजन आघाडीचं बदलेल अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.