मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून, राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाशिक मधील निफाड तालुक्यात गारपिटीने द्राक्षबागांसह ऊस, कांदा, पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी मी आणि माझा पक्ष उभा असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.
अवकाळी पाऊस, गारपीट घोंगावणारा वारा यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये हाताशी आलेल्या द्राक्षाच्या बागा आणि इतर पीक उध्वस्त झाले आहे. आधीच गांजलेला शेतकरी अवकाळी पावसाने अजून खचला आहे, त्याचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि मी ह्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. असे त्यांनी म्हटले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाने त्वरित द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. असेही त्यांनी सांगितले.