छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सव्वा दोन लाख लोक जमल्याचा पोलिसांचा अंदाज!
आतापर्यंतचे सर्व उचांक मोडीत वंचितची विक्रमी सभा!
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान सन्मान सभा लाखों संविधान प्रेमींच्या उपस्थितीत पार पडली. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले.
त्यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आजच्या संविधान सन्मान सभेला आलेले आहेत. त्यांना माझा आग्रह आहे की, वंचित बहुजन आघाडीने संविधानाच्या सन्मानाची चर्चा सुरू केली आहे. तुम्हीसुद्धा संविधानाच्या सन्मानार्थ इतर राज्यात संविधानाची जनसभा घ्यावी. आरक्षणावरून वाद सुरू झालेला आहे. ओबीसीचे जे सध्याचे नेते आहेत त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नका. तुम्ही मंडल सोबत नव्हता तर कमंडल सोबत होता. जनता दलाबरोबर ओबीसी समाजासाठी आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत. आरक्षण वाचवता येत नाही म्हणून भिडवण्याची भाषा करत आहेत. असे म्हणत छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांच्यावर निशाणाही ॲड आंबेडकरांनी साधला आहे.
या देशात लोकशाही आहे तुम्ही ठोकशाही आणणार आहात काय? असा भाजपला सवाल करीत त्यांनी विचारले की, ठोकशाही आणणार असाल तर ती कशी असेल याचा तरी आराखडा सांगा.
मनोज जरांगेची अवस्था सोनिया गांधी सारखी होऊ नये म्हणून त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, सल्लागारांचा सल्ला त्यांनी ऐकू नये. असा सल्ला आजच्या सभेत ॲड. आंबेडकरांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिला.
ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे अशी भूमिका आज त्यांनी संविधान सन्मान सभेत मांडली. ३ डिसेंबरनंतर देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार होण्याची शक्यता त्यांनी आजच्या भाषणातून व्यक्त केली. देशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. असेही त्यांनी भाषणात सांगितले. आम्ही एकत्र यायला पाहिजे अशी अनेकांची भावना आहे मात्र आम्ही एकत्र यायचे की नाही हे ठरवणारा रिंग मास्टर नरेंद्र मोदी आहे. त्यांना वाटले की हे एकत्र आले तर आपण जिंकू तर तो एकत्र येऊ देईल. मोदीने सांगितले तरच ते एकत्र येतील असेही ॲड. आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
या सभेला देशभरात संविधान, मानवी हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रॅमेन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित बेजवाडा विल्सन, आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे गडचिरोली येथील ऍड. लालसु नागोटी, मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद सईद नुरी साहब, हभप, राष्ट्रीय कीर्तनकार माई साहेब, जळगावकर, TISS येथील विद्यार्थी नेते, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते अशोक सोनोने, युवा नेते सुजात आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर, अमित भुईगळ, युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, मुंबई महिला अध्यक्षा सुनीताताई गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, प्रा. किसन चव्हाण, अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, ऍड. प्रियदर्शी तेलंग, दिशा शेख, प्रा. अरुण जाधव, राजेंद्र पातोडे, सिद्धार्थ मोकळे, इम्तियाज नदाफ, पक्षाचे सर्व विभागीय अध्यक्ष, पदाधिकारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रवक्ते राजु वाघमारे आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमीभा पाटील यांनी केले तर आभार सिद्धार्थ मोकळे यांनी मानले.