सरकारचे ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे जाहीर
मुंबई – गेल्या ५२ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. सरकारने सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप जाहीर केली आहे. यावेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पी.एचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
या आंदोलनात सुरुवातपासूनच वंचित बहुजन युवा आघाडीने सक्रिय सहभाग घेतला होता. वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकभाऊ सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य महासचिव राजेंद्र पातोडे यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन आरपारची लढाई लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली होती.
या आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दोन वेळा चर्चा केली होती. तेव्हा सरकारने सकारात्मक पवित्रा घेत “आम्ही मागण्या मान्य करू” असं सांगितले होते.
आंदोलनास्थळी भेट देऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या आमदारांमुळे फेलोशिप रोखली आहे, त्यांना एकदा हाताखालून काढा…असा आक्रमक पवित्रा घेतला. विद्यार्थ्यांनी आंदोलनची दिशा आक्रमक ठेवत विद्यार्थ्यांना थेट मुळावर घाव घालण्याचे सांगितले. ह्या नंतर संध्याकाळी तातडीने मुख्यमंत्री शिंदे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला भेटले व फेलोशिपचा प्रश्न मान्य करत असल्याचे जाहीर केले. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.