अहमदनगर – दि.२९ सप्टेंबर रोजी सोनेगाव ते धनेगाव या रस्त्याचे रखडलेले काम व शिकारे वस्ती (बाळगव्हाण) ते महानुवार वस्ती (लक्ष्मीनगर वाकी) या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळावी. यासाठी खर्डा परिसरातील नागरिक व वंचित बहुजन आघाडी भटके- विमुक्त राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शासनाचे दुर्लक्ष
जामखेड तालुक्यातील सोनेगाव ते धनेगाव (धाकटी पंढरी) व शिकारे वस्ती (बाळगव्हाण) ते महानुवार वस्ती (लक्ष्मीनगर वाकी) हा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे. शासन स्तरावर अनेक वेळा मागणी करूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सोनेगाव ते धनेगाव काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे मुरमीकरण झाले होते. पावसाने टाकलेला मुरूम वाहून गेला आहे. तसेच हे काम अपूर्ण आहे. धनेगाव ही (धाकटी पंढरी) म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला (धाकट्या पंढरीत) हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी दिंडीच्या माध्यमातून दर्शनाला येत असतात.
हजारो भाविक, विद्यार्थ्यांना त्रास
हजारो भाविकांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भाविकांचा अपघात झाला आहे. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक महिला पडून जखमी झाल्या आहेत. तसेच शिकारे वस्ती (बाळगव्हाण) ते महानुवार वस्ती (लक्ष्मीनगर वाकी) या रस्त्याची देखील खूप वाईट दुरावस्था झाली आहे. या ठिकाणाहून जवळपास ६०ते ७० मुली- मुलं शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. हा रस्ता कच्चा असल्याने या मुला- मुलींना शाळेत जाण्यासाठी रस्त्याने मोठी कसरत करावी लागत आहे. चिखलातून रस्ता काढत काढत या मुली- मुलं शाळेत जात आहेत. अनेक वेळा मोठा पाऊस झाल्याने मुलं- मुली जागेवरच गुंतून पडत आहे. अनेक वेळा मागणी करूनही या ठिकाणी पक्का रस्ता होत नाही. वरील सर्व प्रश्नांना घेऊन संबंधित गावातील ग्रामस्थ व ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली खर्डा येथील बस स्थानकासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
४० वर्षांपासून रस्ता कच्चाच !
यावेळी लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणले की ,हा रस्ता ४० वर्षापासून कच्चा आहे तो पक्का झालाच नाही. हा रस्ता होणे खूप गरजेचे आहे. या रस्त्याने अनेक दिंड्या जातात तसेच शाळकरी मुलं-मुली या रस्त्याने शाळेत जातात. आम्ही संविधान दिंडी घेऊन धनेगाव (धाकटी पंढरी) येथे गेलो होतो तेव्हा पण खूप त्रास झाला होता. हा रस्ता झाला नाही तर पुढच्या काळात मोठे आंदोलन हाती घेतले जाईल.
वंचित, बहुजनांचा बालेकिल्ला असल्याने दुर्लक्ष…
यानंतर ॲड. डॉ .अरुण जाधव यांनी ही भूमिका मांडली .ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली. या ७५ वर्षांमध्ये गरिबाला राहायला घर नाही. इथल्या गरीब, कष्टकरी, शेतकऱ्याला गावात जायला रस्ता नाही. अजून ही सोनेगाव ते धनेगाव तसेच वाकी, लोणी शिकारे वस्ती, महानुवार वस्तीच्या रस्त्याचे काम होत नाही. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. या तालुक्यात २ आमदार १ खासदार आहे. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ,हा रस्ता करा या मागणीसाठी लहान मुलं-मुली शाळेमधले आले आहेत. इथल्या आमदार, खासदार यांना जनतेने निवडून दिले आहे. आमची सेवा करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी काही पुढारी सांगतात की ,आम्ही जनतेचे गडी आहोत. माझी त्या गड्यांना विनंती आहे की ,शिकारे वस्ती, महानुवार वस्तीत जाऊन बघा जनतेचे काय हाल आहे. लेकरं शाळेत जाण्यासाठी रडतात. तुम्हाला अश्रूची किंमत आहे की नाही. शेतकऱ्याच्या, गरिबाच्या, कष्टकऱ्याच्या लेकरांची थोडी तरी जाणीव आहे का? तुम्ही निवडून जातात. निवडून गेल्यावर जनतेच्या प्रश्नाचा विसर पडतो. हा खर्डा गट वंचिताचा व बहुजनांचा बालेकिल्ला आहे. म्हणून या मतदारसंघा मध्ये जाणीवपूर्वक विकासाच्या कामासाठी अडथळा केला जातो. हा माझा आरोप आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केले पाहिजे. विकास कामात राजकारण केले नाही पाहिजे. जनता परेशान आहे. तुम्ही त्या प्रश्नावरती राजकारण करत आहे. धनेगाव ही (धाकटी पंढरी) आहे. या पंढरीत हजारो भाविक येतात. त्यांची या रस्त्यामुळे गैरसोय होती. हा रस्ता नाही झाला तर यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला.
यावेळी संविधान प्रचारक विशाल पवार, लोक अधिकार आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारकाताई पवार, दशरथ कोळेकर सर ग्रा पं सदस्य, रावसाहेब खोत मा. सरपंच, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांचेही मनोगते झाली. यावेळी सूत्रसंचालन संविधान प्रचारक अजिनाथ शिंदे यांनी केले. तर आभार गणपत कराळे यांनी मांनले. यावेळी उपस्थित दादासाहेब दाताळ पाटील मा .सरपंच, विकास गोपाळघरे मा. सदस्य, कृष्णा खाडे सरपंच बाळगव्हाण, राहुल गोपाळघरे उपसरपंच, काकासाहेब शिकारे, अंकुश महानवर, नंदराम सावंत, मारुती सूळ, भीमराव सुरवसे, नितीन आहेर, लखन जाधव, रघुनाथ परकड मा. सरपंच लोणी, नानासाहेब वायकर मा सरपंच वाकी, भारत शिंदे मा सरपंच दिघोळ, शहाजी सोनवणे सामाजिक कार्यकर्ते, लक्ष्मण वाळके, सरदार चाचा मदारी, गौरव बागडे, कांतीलाल जाधव, अरुण शिकारे, कैलास शिकारे, करण काळखैर, अर्जुन काळखैर, गणपत सोनवणे, अशोक दाताळ, संतोष पवार, सुरज पवार, अनुज चौगुले, संतोष चव्हाण व खर्डा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.