अमरावती – राज्यातील श्रीमंत व विशेषत: सत्ताधारी मराठे गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी नकारात्मक आहे. राज्यकर्ते मराठे गरीब मराठ्यांनाच स्वीकारत नाही, मग ओबीसी तर त्यांच्या नात्यागोत्याचे किंवा रक्ताचेही नाही. त्यामुळे आता गरीब मराठे व ओबीसींनीही अशा राज्यकर्त्यांना मतदान करावे की नाही, याबाबत विचार केला पाहिजे, असे परखड मत वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
पक्षाच्या शिबिराच्या अनुषंगाने अॅड. आंबेडकर अमरावतीच्या दौर्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणतात, राज्य घटनेप्रमाणे वागायचे नाही, असेच चित्र सध्या देशात आहे. राज्यघटनेनुसार लोकप्रतिनिधींच्या सभागृहाशिवाय प्रशासन कारभार करू शकत नाही; मात्र तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाने वेळेवर घेतल्या नाही. सर्वोच्च न्यायालयानेही तत्काळ निवडणुका घ्या, असे स्पष्ट आदेश दिले नाही. घटनेच्या चौकटीला ते धरून नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
खरंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ज्या प्रमाणे या देशात मंदिर, मशीद किंवा कुठलीही इमारत होती ती तशीच पुढे जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, चारशे वर्षांपूर्वी याठिकाणी असं होतं, असे विषय सुरू करण्यात कुठलाही अर्थ नाही. असेच जर करायचे असेल तर उद्या जगाने आपल्याला अशोकाच्या काळात भारतात काय होते असे विचारले तर अशोकाच्या काळात असणारा भारत आता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार का? खरंतर हे सर्व अशक्य आहे आणि अशा चुकीच्या विषयांकडे समाजाला वळविणे योग्य नाही. जुने वाद उकरून काढण्यासाठी केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्था नाही. न्यायव्यवस्थेने आणि केंद्राने आपल्या मर्यादेत राहावे, असा इशारा देखील अॅड. आंबेडकर यांनी दिला.